नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवानिमित्त बालभवनच्या वतीने आयोजित ‘अमृतस्वर’ गायन स्पर्धेची दुसरी फेरी स्पर्धकांच्या सुरेल आविष्काराने रंगली. या फेरीतून एकूण १९ बालगायकांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या स्पर्धेचा प्रारंभ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साने गुरुजी व सरस्वतीपूजनाने झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सावानाचे उपाध्यक्ष नरेश महाजन, शुभांजली पाडेकर, धनंजय धुमाळ, समन्वयक नवीन तांबट, श्याम पाडेकर, रमेश जुन्नरे, कर्नल आनंद देशपांडे, डॉ. आशा कुलकर्णी, प्रकाश वैद्य, जगदीश वैरागकर उपस्थित होते. या फेरीत स्पर्धकांनी चांदणे शिंपीत जाशी, मन मंदिरा तेजाने, दत्तासी गाईन, फुलले रे क्षण माझे, जाहल्या काही चुका, कानडा राजा पंढरीचा, मनाला झाली कृष्णसख्याची बाधा, अखेरचा हा तुला दंडवत, गगन सदन तेजोमय यांसारखी एकाहून एक सरस गाणी सादर करीत उपस्थितांची दाद घेतली. परीक्षक म्हणून आनंद अत्रे, मीना परूळेकर-निकम यांनी काम पाहिले. ‘अमृतस्वर’ स्पर्धेची तिसरी फेरी रविवारी (दि. १०) होणार आहे.
१९ बालगायकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:25 IST