नाशिक : लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील वाहनविक्री आणि गृहविक्री व्यवसायाला काहीशी झळाली आल्याचे चित्र बाजारात असून, या दोन दिवसांत तब्बल दीडशे कोटींच्या आसपास उलाढाल होणार असल्याचे वृत्त आहे. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांनी दुचाकीसह चारचाकी, घर खरेदीसह गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बरीच मोेठी उलाढाल केल्याचे समजते. या दोन दिवसांत तब्बल १३०० ते १४०० चारचाकी वाहनांचे बुकिंग झाल्याचे कळते. तसेच अडीच ते तीन हजार दुचाकींची विक्री झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे गृहनिर्माण उद्योगातही या दोन दिवसांत झळाळी आल्यामुळेच की काय, सुमारे २५० ते २७५ फ्लॅटचे बुकिंग शहरात झाल्याचे बोलले जाते. गृहोपयोगी वस्तू आॅनलाइन विकत घेण्याचा ट्रेंडही शहरात जोरात असून, त्यास आॅनलाइनमध्ये बिघाड झाल्याने काहीसा फटका बसल्याची चर्चा होती. तरी लक्ष्मीपूजन व पाडवा या दोन दिवसांत तब्बल पाच कोटींहून अधिक रकमेच्या गृहोपयोगी वस्तू व साहित्यांची खरेदी-विक्री झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या दोन दिवसांत नाशिककरांनी दीडशे कोटीहून अधिक रकमेची उलाढाल केल्याचे समजते. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत दीडशे कोेटींची उलाढाल
By admin | Updated: November 11, 2015 23:17 IST