नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत गेल्या नऊ महिन्यांपासून प्राप्त असलेल्या ३५ कोटींच्या निधीचे नियोजन फाईलींच्या प्रवासात अडकल्याचे वृत्त आहे. बुधवारी (दि. ३) स्थायी समितीच्या मासिक बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. समाजकल्याण सभापती ते अध्यक्ष कार्यालय या एकाच इमारतीतील फर्लांगभर अंतरासाठी चक्क १४ दिवसांचा कालावधी लागल्याची माहिती सभेतूनच उघड झाली.दरम्यान, संबंधित समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी हे सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी सदस्यांनी केली. तर वळवी यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्यांना कामावर रुजू करू नये, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिल्ािंद शंभरकर यांनी बैठकीत दिले. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य प्रवीण जाधव यांनी या ३५ कोेटी रुपयांच्या निधी खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच समाजकल्याण अधिकारी हे दीड वर्षाच्या कार्यकाळात सुमारे १० महिन्यांहून अधिक काळ रजेवर असल्याने ते कामासाठी फिट नाहीत. त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे,अशी सूचना त्यांनी मांडली. गोरख बोडके यांनी दलितवस्ती सुधार योजनेचा ३५ कोटींचा निधी फेब्रुवारी उजाडूनही खर्च होत नसल्याबाबत विचारणा केली. प्रा. अनिल पाटील यांनी विचारले की, जून महिन्यात प्राप्त झालेला निधी नऊ महिने होऊनही अद्याप अखर्चित दिसत असून त्यास जबाबदार कोण? अशी विचारणा केली. समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी आपल्याकडे या कामाची नस्ती मंजुरीसाठी १९ जानेवारीला आली आणि आपण २० जानेवारीला ती अध्यक्ष कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगितले. त्यावर अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी आपल्याकडे ही नस्ती मंगळवारीच (दि. २) आल्याबरोबर आपण मान्यता देऊन फाईल संबंधित विभागाकडे पाठविल्याचे सांगितले. त्यावर प्रवीण जाधव व अनिल पाटील यांनी सभापती आणि अध्यक्ष कार्यालयात एक फर्लांगभर अंतर असताना इतके १४ दिवस फाईल कुठे हरविली होती, अशी विचारणा केली. प्रवीण जाधव यांनी समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी यांना रजेवर पाठविण्याची मागणी केली. त्यावर फाईल विलंबास जबाबदार कोण? त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिल्ािंद शंभरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फर्लांगभर अंतरासाठी १४ दिवस
By admin | Updated: February 3, 2016 22:55 IST