नाशिक : मुदत संपलेल्या व कमी देय रकमेचा परतावा असलेल्या जिल्ह्यातील एकूण १२५ ‘मैत्रेय’च्या ठेवीदारांना शुक्रवारी (दि.२८) समारंभपूर्वक त्यांच्या रकमेचे डिमांड ड्राफ्ट पोलीस आयुक्तांच्या हस्ते वाटप केले जाणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लहान गुंतवणूकदार व ज्यांचे धनादेश वटलेले नाहीत आणि जे शहरासह जिल्ह्यातील रहिवासी आहेत, अशा ठेवीदारांचा प्राधान्यक्रम समितीने ठरविला आहे. याच प्राधान्यक्रमानुसार ठेवीदारांना त्यांची रक्कम दिली जाणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, तहसीलदार, कंपनीचा सदस्य अशा चार लोकांचा समावेश आहे. या समितीकडून आलेल्या अर्जांची पडताळणी के ली जाणार आहे. दर आठवड्याला पडताळणी होऊन संबंधितांच्या बॅँक खात्यामध्ये एस्क्रो खात्यातून इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग यंत्रणेद्वारे रक्कम वर्ग केली जाईल. आज रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये १२५ लहान गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेचे ‘डिमांड ड्राफ्ट’ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते वाटप केले जाणार असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.बॅँक खात्याची माहिती व गुंतवणुकीचे पुरावे सादर करण्यासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात ठेवीदारांची अलोट गर्दी झाली होती. मैत्रेय घोटाळ्यात एकूण ३१ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रारदारांची संख्या जवळपास चौदा हजाराच्या पुढे गेली आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल दीड हजारांच्या वर नवीन तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.आपल्या बॅँक खात्याची माहिती शाखा, आयएफसी कोड, एमआयसीआर कोड, खाते क्रमांक नोंदवून पोलिसांनी दिलेल्या विहित नमुन्यामध्ये गुंतवणुकीसंदर्भात आवश्यक ती सर्व माहिती भरून ठेवीदारांनी नमुना अर्ज जमा केले. एस्क्रो खात्यामध्ये सध्या सहा कोटी ४२ लाख रुपये जमा आहेत.
१२५ ठेवीदारांना आज मिळणार ‘डिमांड ड्राफ्ट’
By admin | Updated: July 29, 2016 00:55 IST