येवला : पालखेड कालवा प्रशासन, पोलीस यांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्याने व पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून अनधिकृत उपसा झाला. अशा स्थितीत ‘लोकमत’ने पाणी वितरण पद्धतीवरच प्रहार करत पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून गेले दोन दिवस जागर केला. याचा दृश्य परिणाम येवल्यात दिसला आहे. शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान १२ दलघफू पाण्याचा साठा सोमवारी करता आला. आणखी तीन दिवसात किमान ४५ दलघफू पाणी साठवण तलावात भरण्याचे उद्दिष्ट आहे.दरम्यान, येवला शहर व तालुक्याचे पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर झाले होते. राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनेक डोंगळे तोडले गेले. दांडगाई काही अंशी कमी झाली आणि पाण्याचा वेग रविवारी वाढला. त्यामुळे किमान काहीअंशी तरी येवल्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. शहर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान ५ दिवस लागतील असे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांनी सांगितले. पालिका व इरिगेशन यांचे संयुक्त पथक सध्या पाण्याच्या टेहळणीवर आहे. शिवाय अनेक भागातील ७० ते ८० डोंगळे काढण्याची कारवाई पथकाने केली आहे. शहर साठवण तलाव आणि ३८ गाव पाणीपुरवठा साठवण तलाव एकाच वेळी भरून घेण्याचे काम सध्या चालू आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत होते. ‘लोकमत’ने पालखेडचे पाणीचोरीचा जागर गेले दोन दिवस केल्याने किमान येवल्यासह अनेक भागांना किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब लहरे यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)
येवला साठवण तलावात १२ दलघफू पाणीसाठा
By admin | Updated: January 12, 2016 00:29 IST