नाशिक : दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या परीक्षेसाठी येवला तालुक्यातील अंदरसूल येथील शाळेत सामुहीक कॉपीचा पअयत्न होत असल्याचे उघड झाल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. यासंदर्भात शिक्षण विभागाने दखल घेतली असून पुढील परीक्षांसाठी येथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.दहावीचा पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही परीक्षेला सामोरे जावे लागले. मराठवाड्यात काही ठिकाणी झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा नाशिक विभागावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे येथील परीक्षा सुरळीत पार पडल्या. विभागात एकही कॉपी केस आढळली नाही. दुपारच्या सत्रात जर्मन, फ्रेंच या विषयांची परीक्षा झाली. नाशिक विभागातून दोन लाख दोन हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. दि. १७ मार्चपर्यंत ही लेखी परीक्षा सुरू राहणार आहे.बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ, शिक्षण विभागाने नियोजन केले असून, भरारी पथकांसह तिसऱ्या डोळ्याची नजर या केंद्रांवर ठेवण्यात आली आहे. कॉपी केस आढळणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्याने शाळापातळीवरही त्याबाबत सतर्कता बाळगली जाते आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कॉपी केसेस कमी आढळत आहेत. संवेदनशील केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यासह भरारी पथकांच्या फेऱ्याही वाढविल्या गेल्या आहेत.
दहावी परीक्षा : पेपरफुटीचा विभागावर परीणाम नाही; येवला येथे सामुहीक कॉपीचा प्रयत्न
By संकेत शुक्ला | Updated: February 21, 2025 20:32 IST