आरोग्यदायी कुंभ : २१ हजार रुग्णांवर उपचारत्र्यंबकेश्वर : आखाड्यांसह जगभरातून येणाऱ्या भाविकांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शासनाच्या १०८ क्रमांक फिरवून मिळणाऱ्या रुग्णवाहिकेने येथे चांगली सेवा दिली असून, दोन गर्भवती महिलांची सुखरूप प्रसूती होण्याला मदत झाली आहे. एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला असून, कुंभमेळ्यात जन्मलेल्या या शिशूंची आणि त्यांच्या मातांची प्रकृती उत्तम आहे.त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात २८ ते ३० आॅगस्टदरम्यान ६०५८ बाह्य रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ८० रुग्णांना रुग्णालयात दाखल करवून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शासनाच्या १०८ हेल्पलाइन या रुग्णवाहिका सेवेचा ४ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत २१ हजार ८८८ रुग्णांना फायदा झाला. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू व भाविकांची गर्दी लक्षात घेऊन १०८ च्या ८० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून, त्यात काही अघटित घटना घडल्यास पाच रॅपिड रिस्पॉन्स टीमही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यातील दोन रुग्णवाहिका दररोज सकाळ-सायंकाळ त्र्यंबकमधील दहा आखाड्यांना भेट देऊन साधू व भक्तांची तपासणी करीत आहे. आतापर्यंत आखाड्यांतून २९७ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात आणावे लागले. रुग्णालय व १०८ च्या टीमद्वारे कुशावर्तकुंड, त्र्यंबकेश्वर मंदिर, शाहीमार्ग, रक्षकनगर, साधुग्राम या ठिकाणी बूथ लावण्यात आले असून, तेथेही रुग्णांवर तत्काळ उपचार केले जात आहेत.सिंहस्थ पर्वकाळात अंजनेरी येथील सविता माळेकर या गर्भवतीला त्रास सुरू झाला असता १०८ रुग्णवाहिकेमध्येच परिचारिका शिला शिंदे व डॉक्टरांनी डिलेव्हरी केली. या महिलेने पायाळू स्थितीत असणाऱ्या दोन बाळांना जन्म दिला. अहिल्या घाटावर स्नानासाठी गेलेल्या गोरेवाडी, नाशिकरोड येथील उषा म्हात्रे या गर्भवती महिलेला त्रास सुरू झाला. रुग्णालयात आणेपर्यंत १०८ रुग्णवाहिकेमध्येच त्यांची डिलेव्हरी झाली व त्यांनी एका मुलाला जन्म दिला. रक्षननगर, साधुग्राम येथे लावण्यात आलेले बुथ व १०८ रुग्णवाहिकेद्वारे पोलीस कर्मचारी व साधूंचीही तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तिसऱ्या श्रावणी सोमवारला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन फेरीमार्गावर चार रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. यावेळी सहा जणांना हृदयविकार अर्थात श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. आॅगस्ट महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे विविध प्रकारच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात, रुग्णवाहिकेत व ठिकठिकाणच्या बूथवर चांगली रुग्णसेवा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे दोन महिलांची सुखरूप प्रसूती
By admin | Updated: September 1, 2015 22:09 IST