नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये होणाऱ्या कविकट्ट्यामध्ये महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला असून परराज्यातून आणि परदेशातूनही मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. कविकट्ट्यासाठी कविता पाठवण्याच्या मुदतीपर्यंत २७५० प्राप्त कवितांमधून ४६७ कवींच्या प्रत्येकी एका कवितेची निवड करण्यात आली असून त्यातील १० कवी विदेशातून खास कविकट्ट्यासाठी संमेलनात ऑनलाईन सादरीकरण करणार आहेत.
त्यामध्ये प्रमाण मराठी भाषा, विविध बोलीभाषा, त्याचप्रमाणे गझल यांचा समावेश आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या मिळून एकूण ४६७ कवींच्या कविता सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये गझल आणि बोलीभाषेच्या (अहिराणी, भोयरी इत्यादी) कविता यांचा समावेश आहे. परदेशातून म्हणजे अमेरिका, सिंगापूर या ठिकाणच्या कविता पडद्यावर दाखविण्याची कल्पना आहे. एकंदरीत पाहता हा कविकट्टा किमान एक पूर्ण दिवस म्हणजे, सहजपणे २४ तास चालेल असे चित्र आहे. यावेळी प्रथमच गझलसाठी आपण वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने राजन लाखे आणि प्रसाद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती प्रमुख संतोष वाटपाडे, उपप्रमुख स्मिता पाटील व डॉ. स्मिता मालपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून कविकट्ट्याच्या नियोजनाची आखणी केलेली आहे.