लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या सुमारे सव्वा लाखाहून अधिक असताना समाजकल्याण विभागाकडे लसीकरणासाठीची जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या अवघी ८८१९ इतकीच नोंदवली गेली आहे. एकीकडे शासन दिव्यांगांना लसीकरणात प्राधान्य देणार असल्याचे म्हणत असताना मूळात दिव्यांगांचीच नोंद जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरणच नव्हे तर अन्य योजनांतही संबंधित लाभ सर्व दिव्यांगांपर्यंत कसे पोहोचत असतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाकडे ग्रामीण भागातील केवळ ८८१९ नागरिकांचीच लाभार्थी म्हणून नोंद आहे. त्यापैकीही केवळ २३५० दिव्यांगांचेच लसीकरण झाले आहे. अर्थात मूळात दिव्यांगांची नोंदणीच जर प्रत्यक्षातील दिव्यांगांच्या तुलनेत एक दशांशपेक्षाही कमी असेल तर त्याचा लाभ मिळण्याचे प्रमाण अत्यल्प असणे साहजिकच आहे. जिल्ह्यातील अंध बांधवांसाठी कार्य करणाऱ्या ‘नॅब’ या संस्थेकडेच २०११ च्या जनगणनेनुसार २० हजार १४ इतकी अंध व्यक्तींची नाेंद असल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. जर अंध दिव्यांगच इतके असतील अन्य प्रकारांमधील मूक-बधीर, मतिमंद, गतिमंद, हात-पायाने दिव्यांग अशा २१ प्रकारांमधील दिव्यांगांची संख्या ही किमान दीड लाखाच्या आसपास असण्याचीच शक्यता आहे.
इन्फो
किमान २ ते ३ टक्के प्रमाण
जागतिक निकषानुसार सर्वसाधारणपणे एकूण लाेकसंख्येच्या तुलनेत सुमारे २ ते ३ टक्के इतके दिव्यांगांचे प्रमाण असते. त्या दृष्टीने विचार केल्यास जिल्ह्यातील सुमारे ६५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत दिव्यांग बांधवांची संख्या किमान सव्वा लाख ते पावणे दोन लाख इतकी असण्याची शक्यता आहे.
इन्फो
२०१८ साली दिव्यांगांचे २१ प्रकारात वर्गीकरण
केंद्र शासनाने कोणत्याही अवयवहीन, न्यूनत्व किंवा अपंग व्यक्तीला दिव्यांग संबोधण्याचे आदेश काढतानाच सर्व दिव्यांगांचे २१ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यामुळे त्यानंतर तर दिव्यांगांच्या संख्येत मोठीच भर पडल्याचेही दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात नोंदींमध्ये ही आकडेवारी अद्यापही आलेली नसल्याने दिव्यांगांसाठीच्या कोणत्याही योजनांचा लाभ सर्व
दिव्यांगांपर्यंत पोहोचणेच शक्य नाही.
इन्फो
जिल्ह्यात अनेक दिव्यांगांकडे अद्याप जुने हाताने लिहून दिलेले प्रमाणपत्रच आहे. त्याशिवाय प्रमाणपत्र न मिळालेले, अपंग प्रमाणपत्रापासून वंचित असलेले हजारो दिव्यांग बांधव आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांगांना तातडीने प्रमाणपत्र वितरित केल्यासच सर्व दिव्यांगांना त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळू शकणार आहे.
दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना
कोट
२०११ साली झालेल्या जनगणनेमध्ये अंधांचीच संख्या तब्बल २० हजार १४ इतकी नोंदवली गेली आहे. त्यानंतरच्या गत १० वर्षांत विशेषत्वे २०१८ च्या नवीन आदेशानंतर काही अंशत: अपंगांचे प्रमाणही वाढलेले असल्याने केवळ अंध दिव्यांगांचीच संख्या २५ हजारांवर असण्याची शक्यता आहे.
मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सहसचिव, नॅब
जिल्ह्यातील दिव्यांगांच्या लसीकरणाच्या नोंदणीत ८८१९ दिव्यांगांची नोंद आहे. त्यातील २३५० दिव्यांग बांधवांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील दिव्यांगांच्या लसीकरणाची माहिती महापालिकेकडे मिळू शकणार आहे.
विजय पाटील, दिव्यांग लसीकरणप्रमुख, समाज कल्याण विभाग
फोटो
२९दिव्यांग