लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पिकावर औषध फवारणी करताना विषबाधा होऊन तालुक्यातील कोठली येथील तरुण शेतक:याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तरुण शेतक:याच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोठली येथील तरुण शेतकरी प्रवीण धनराज माळी (19) व त्याचे वडील धनराज माळी हे शेतात पिकांवर फवारणीचे काम करीत होते. सायंकाळी प्रवीणने वडिलांना तुम्ही घरी जा मी नंतर येतो, असे सांगितले. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही प्रवीण घरी आला नाही म्हणून धनराज माळी यांनी पत्नीला विचारणा केली. धनराज माळी हे पुन्हा शेतात गेले. तेथे प्रवीणला आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी शेतात जाऊन तपास केला असता त्यांना प्रवीण भुरळ येऊन पडलेला आढळला. त्यांनी गावातील आसाराम माळी व देवेंद्र खैरनार यांना कळविल्याने ते शेतात आले. त्यांनीही प्रवीणला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच अवस्थेत त्याला घरी आणण्यात आले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. याबाबत सारंगखेडा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. धनराज माळी हे वडिलोपार्जीत व भाडेपट्टय़ाने जमीन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रवीण हा दोंडाईचा येथील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच कुटुंबाला शेतीकामासाठी मदतही करायचा. त्याच्या मृत्यूने कोठलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फवारणी करताना विषबाधेने तरुण शेतक:याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:21 IST