लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीच्या घाटावर रविवारी ऋषीपंचमीनिमित्त भाविकांऐवजी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. तापी नदीघाट, केदारेश्वर, संगमेश्वर मंदिर, आसारामजी आश्रम, प्रकाशा बसथांबा आदी सर्व ठिकाणी बॅरिकेटींग लावण्यात आली होती. पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ऋषीपंचमीनिमित्त प्रकाशा येथील तापी नदी पात्रात स्नान करण्यासाठी व दर्शनासाठी महिलांची पहाटेपासून गर्दी होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत गर्दी असते. स्नान झाल्यानंतर ब्रह्मवृंदाकडून कथा श्रवण केल्यानंतर महिला भाविक केदारेश्वर, पुष्पदंतेश्वर मंदिरावर दर्शन घेतात. त्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतात. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच सण-उत्सवांवर बंदी आल्यामुळे शासनाने गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकाशा ग्रामपंचायतीनेही ठराव करून ऋषीपंचमीसाठी महिला भाविकांनी प्रकाशा येथे येऊ नये, असा ठराव केला होता. प्रकाशा गावातही कोरोना बाधित चार रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायतीने खबरादारी म्हणून हा निर्णय घेतला. त्यानुसार शहादा पोलिसांनी शनिवारपासूनच बंदोबस्त ठेवला होता. प्रकाशा येथील बसथांबा परिसरात बॅरिकेट लावून रस्ता बंद केला होता. आसारामजी बापू आश्रमजवळून एक मार्ग संगमेश्वर मंदिराकडे जातो त्याठिकाणीही बॅरिकेट लावले होते. त्यानंतर केदारेश्वर मंदिराच्या मुख्य गेटजवळ परिसर सील केला होता. याठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला. मंदिराच्या पायऱ्यांजवळ पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील तर तापी नदीघाटावर पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांनी पोलीस कर्मचाºयांसह बंदोबस्त ठेवला. १० पोलीस कर्मचारी व २५ महिला होमगार्ड कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. काही भाविक आले असता त्यांना परतून लावत होते. सकाळी नंदुरबार, मंदाणे, शहादा, दोंडाईचा येथील काही भाविक रिक्षा करून आले होते. मात्र त्यांना पोलिसांनी रिक्षातून उतरू न देता परत पाठविले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, शहाद्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तापी नदीघाट व केदारेश्वर मंदिर परिसरात जाऊन पाहणी केली. दिवसभर मंदिर परिसरात फक्त पोलीस दिसून आले. पोलिसांना सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जे. पाटील यांनीही सहकार्य केले.
प्रकाशा येथील केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर आदी सर्वच मंदिरांना गेल्या पाच महिन्यांपासून कुलूप असल्याने मंदिर बंद आहेत. गावातील मंदिरांमध्येही शांतता होती. संगमेश्वर मंदिरावर व गौतमेश्वर मंदिरावरही भाविकांनी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याठिकाणी पोलीस असल्याने भाविकांनी परत जाणे पसंत केले. तापी नदीच्या पलिकडे ेखील पोलिसांचा बंदोबस्त होता. तरीही ४० ते ५० महिला भाविक सावळदा रस्त्याकडून स्नान करण्यासाठी एकत्र झाल्या होते. ही माहिती पोलिसांना समजताच त्यांनी त्याठिकाणी जाऊन महिलांना परत पाठविले.
लोकमत’ने एक दिवस आधीच प्रकाशा ग्रामपंचायतीचा ठराव व महिला भाविकांनी येथे तापी घाटावर येऊ नये ही बातमी प्रसिद्ध केल्यामुल्ळे चांगला प्रचार-प्रसार झाला. प्रकाशा ग्रामपंचायत व पोलिसांनीही सूचना फलक तयार करून ठिकठिकाणी लावले होते. सोशल मिडियावरही याबाबत माहिती देण्यात आली होती. ऋषीपंचमी असली तरी भाविक आले नाहीत. जे भाविक आले त्यांना पोलिसांनी परत पाठविले. गणपती विसर्जनालादेखील असाच बंदोबस्त राहणार आहे. -किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, शहादा.