नंदुरबार : शहरातील विविध भागात राँग साईडने वाहन चालवत शाॅर्टकट घेऊन इच्छितस्थळी पोहोचणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु हा प्रकार चुकीचा असून यातून नागरिकांना जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागण्याची भीती आहे.
शहरातील एकेरी मार्ग मोजून तीन आहेत. सोबत वळण रस्ता आहे. या रस्त्यांवर अनेक जण राँग साईड वाहन चालवून अपघात ओढावून घेत आहेत. गेल्या दोन वर्षात जीवघेणे अपघात घडले नसले तरी किरकोळ अपघात आणि त्यानंतरचे वाद यामुळे अनेकांना मनस्तापही सहन करावा लागल्याचे वेळाेवेळी समोर आले आहे.
नगरपालिका चाैक
नगरपालिका चाैक ते शास्त्री मार्केट असा एकेरी मार्ग आहे. शहरातील बाजारपेठेच्या या रस्त्यावर मात्र दुहेरी वाहतूक सुरू असते.
अपघातांना निमंत्रण
प्रवेशबंदी असताना चाैकात दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
कर्मचारी नियुक्त
येथे कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
सोनार गल्ली
सोनार खुंट ते साक्री नाका दरम्यान एकेरी मार्ग आहे. परंतु या मार्गानेही वाहतूक सुरू आहे. दोन मोठी वाहने येथे वाहतूक कोंडी होते.
वाद आणि भांडणे
येथे चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास वाद व भांडणे होतात. यामुळे इतरांना अडचणीचे ठरते.
पोलीस असून नसून
याठिकाणी कर्मचारी नियुक्त असूनही फायदा होत नाही.
बायपास रोड
शहरातील धुळे चाैफुली ते तळोदा रोड यादरम्यान विस्तृत असा बायपास आहे. या बायपासने राँग साईड प्रवास करणारेही खूप आहे.
असा होतो प्रवास
मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वसाहती आहेत. या वसाहतींकडे जाताना अनेकजण नियमांकडे दुर्लक्ष करतात. यातून अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. रात्रीच्यावेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते.
पोलिसांकडून सातत्याने होताहेत कारवाया
शहरातील एकेरी प्रवेशबंदी असलेल्या मार्गावर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे कारवायांची संख्या कमी झाली आहे.
पोलिसांकडून कारवाई करण्यापेक्षा एकेरी मार्गाने प्रवेश घेणाऱ्यांना समज देण्यावर अधिक भर दिला जात आहे.
नंदुरबार शहरात एकेरी मार्ग मंजूर आहेत. बेशिस्तांवर कारवाई करण्यात येते. अनेक जण कारवाई झाल्यानंतरही त्याच मार्गाने प्रवास करतात. काही जण शाॅर्ट कटच्या नादात बाहेर पडतात. यातून नियम मोडले जातात. त्यांच्यावर कारवाई केली जाते.
-अविनाश मोरे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा,नंदुरबार.