लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बहुप्रतिक्षेतील नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून तरुणाई, महिला भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात आदिशक्तीची विशेष आराधना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातील विविध गरबा मंडळांमार्फत भरीव कार्यक्रम घेण्यात आले. अतिवृष्टीसह सतत होणा:या पावसामुळे सहसा बाहेर न पडलेले नंदुरबार जिल्ह्यातील भाविक शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त बाहेर पडू लागले आहे. पितृपक्ष असला तरी विविध साहित्य खरेदीसाठी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवार व रविवार दुपारी भाविकांनी बाजारात गर्दी केली होती. दरम्यान भाविकांमार्फत विविध प्रकारचे दिवे, केरसुणी, टोपली, फुले व अन्य साहित्य खरेदी करण्यात आली. त्यामुळे बाजारात तब्बल 15 दिवसांनी प्रथमच मोठी उलाढाल झाली. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रात असला तरी या जिल्ह्याचा प्रशासकीय वगळता अन्य सर्वच दृष्टीने गुजरातशीच अधिक संबंध येतो. नवरात्र व गरबा या बाबतीतही हेच संगता येतील. गणेशोत्सवनंतर नवरात्रोत्सवाचे वेथ लागले होते. अशा बहुप्रतिक्षेतील उत्सवाला रविवारी सुरुवात झाली. तरुणाईपाठोपाठ दुर्गा मातेच्या भाविकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. या उत्सवासाठी नंदुरबार शहरात विविध गरबा मंडळांमार्फत दिवसभरात सजावटी कामे पूर्ण करण्यात आली. त्यात अंबिका गुजराती मंडळ, रघनाथ गरबा सराफ बाजार गरबा मंडळ यांच्यासह अन्य मंडळांचा समावेश आहे. अंबिका गुजराती मंडळातर्फे रात्री नऊ वाजता माता मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र वाघेला. उपाध्यक्ष नितीन सोनी, सचिव विरल वाडीया, किर्ती सोलंकी, मोज सोलंकी, कार्तिक दोषी, वसंत गोईल, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या मंडळामार्फत डि.जे.विना हा उत्सव साजरा केला जाणार आहे. केवळ महिला व बालकांसाठी फॅन्सी व अन्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर रघनाथ मंडळामार्फत मंगल भवनात नऊ दिवस महिलांसाठी गरब्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुबोध वाणी, डॉ.अनिल शाहा, सचिव अंकलेश शाह, पियुषकुमार शाह, रजनीकंत वाणी हे परिश्रम घेत आहे. सराफ बाजार गरबा मंडळामार्फत नीना सोनी, भूमी सोनार, नुपूर श्रॉफ, उर्वी सोनार, सोनल सोनार, मनाली सोनार, मिनल सोनार, सुनयना सोनार, सुवर्णा सोनार, राजश्री सोनार यांच्यासह 30 जणांचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. या मंडळातर्फे दररोज गरबा नृत्य करण्यात येत आहे.
भावभक्तीत आदिशक्तीची आराधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:35 IST