लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामातील हरभरा पिकावरील शेतीशाळा घेण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी रामू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेतीशाळा घेण्यात आली. आत्मा योजनेचे बीटीएम चंद्रकांत बागुल यांनी शेतीशाळेचे प्रास्ताविक केले. सेंद्रीय पद्धतीने हरभरा पिकाचे उत्पादन कसे वाढवाल याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यात विविध सेंद्रिय कीटकनाशक, दशपर्णी अर्क, लमीत, ब्रम्हाश्र, जीवामृत बिजामृत याविषयी मार्गदर्शन केले. या गावातील बहुसंख्य शेतकरी हे हरभरा उत्पादक असल्याने हरभरा पिकाच्या अनुषंगाने कृषी सहायक शशिकांत गावित यांनी गावातील २५ हरभरा उत्पादक शेतकर्यांची निवड करून त्यांना शेतीशाळेबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी हरभरा पिकावरील घाटे अळी, तिचे जीवनक्रम, विविध अवस्था, एकात्मिक कीड व्यवस्थापन व कमी खर्चाचे उपाय सांगून आपले पीक सुरक्षित राहते व कमी खर्चात अळीचा बंदोबस्त करता येतो. निंबोळी अर्काचा वापर केल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करून मित्रकिडींची संख्या वाढवता येते याबाबतची माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी राजू हिरे यांनी हरभरा पिकावरील शत्रू व मित्रकीड यांची ओळख, त्यांची आर्थिक नुकसानीची पातळी याबाबत मार्गदर्शन केले. ही शेतीशाळा गंगूबाई चौरे यांच्या शेतावर घेण्यात आली. शेतीशाळेस पंचायत समिती सदस्य संतोष साबळे, खंडेराय व शेषराव महिला शेतकरी बचत गटाच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. आभार चैतन्य संस्थेच्या जिल्हा समन्वयक मोहिनी पाटील यांनी मानले. गौतम रामराजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतीशाळा नियोजनासाठी परिश्रम घेतले.
वाघाळे शिवारात कृषी विभागातर्फे महिला शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:31 IST