निवेदनात म्हटले आहे की, मागील २५ वर्षांपासून गणोर गावात दारूबंदी आहे. परंतु गणोर गावापासून एक किलोमीटर अंतरावर गावठी दारूची विक्री जोरात होत असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये दारू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. अवैध दारू विक्रीचे प्रमाणदेखील वाढल्याने काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी दारू विक्रीवर बंदीचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्या दिवसापासून आधीप्रमाणेच दारूची विक्री सुरू झालेली आहे. दारूमुळे गावात गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. अवैध आणि बनावट दारू विक्री व सेवनामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून तात्काळ दारूविक्रीवर बंदी घालावी, असे निवेदन म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना देण्यात आले.
यावेळी बिरसा फायटर्स शाखेच्या गणोर महिला अध्यक्षा कविता भामरे, उपाध्यक्षा वसंती निकुम, प्रसिद्धी प्रमुख वीणा शेल्टे, बिरसा फायटर्स शाखा गणोरचे अध्यक्ष राहुल रावताळे, उपाध्यक्ष चंद्रकांत शेल्टे, लक्ष्मण तडवी, सचिन तडवी, सचिव राजेश पावरा, सल्लागार युवराज रावताळे, अजित पटले, सदस्य रवींद्र वळवी, उमेश ठाकरे आदी उपस्थित होते.