धडगाव तालुक्यातील चांदसैलीच्या पिपलाकुवा येथील सिदलीबाई आदल्या पाडवी ह्या गेल्या तीन-चार दिवसांपासून आजारी होत्या. मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे पती आदल्या पाडवी यांनी ठरवले होते. परंतू रात्रभर पाऊस सुरू असल्याने त्यांनी पाऊस ओसल्यानंतर सकाळी पत्नीला तळोद्याकडे नेण्याचे निश्चित केले. गावातील एका मोटारसायकलस्वाराला आर्जव करुन सकाळी ७ वाजेच्या सुमारास चांदसैलीहून आदल्या पाडवी हे आजारी पत्नी सिदलीबाई यांच्यासह तळोदाकडे निघाले होते. दरम्यान गावापासून दोन किलोमीटर अंतरावर दरड कोसळल्याचे दिसून आल्यानंतर दुचाकीस्वार दोघांना रस्त्यावर सोडून परत फिरला होता. अशावेळी वाहतुकीचे कोणतेही साधन नसल्याने पती आदल्या पाडवी यांनी सायदीबाई यांना खांद्यावर टाकून मार्गक्रमण सुरु केले होते. यादरम्यानच सायदीबाई यांचा मृत्यू झाला होता. परंतू पत्नी जिवंत असावी असा धीर धरत त्याने पायी चालणे सुरु ठेवले होते. पायपीट करत आलेल्या आदल्या पाडवी यांनी घाटाच्या खाली असलेले कोठार हे गाव गाठले होते. येथे गयावया करत एका वाहनचालकाला सांगून तळोदा उपजिल्हा रुग्णालयाकडे पाडवी निघाले होते. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर पत्नी आता जिवंत नाही हे पूर्णपणे लक्षात आल्यानंतर गेटवरुन पुन्हा मृतदेह घेत आदल्या पाडवी हे परत आल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर चांदसैली येथे धडगाव व तळोदा तालुक्यातील प्रशासकीय, महसूल व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी भेट देत माहिती जाणून घेतली. पाडवी हे चार दिवसांपूर्वी आजारी पत्नीला भेटण्यासाठी गुजरात राज्यातून गावी आले होते.
दरम्यान घटनेची माहिती सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, चांदसैली जवळील पिपलाकुवा येथील महिला सिदलीबाई पाडवी यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असून दरडीखाली सापडल्याने झालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील पिपलाकुवा येथील या महिलेला तिच्या कुटुंबीयांनी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील परिचारिकेने तपासणी केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच सिदलीबाई यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान रुग्णालयाकडून तिच्या पतीस इतरांना तळोदा पोलीस ठाण्यात कल्पना देण्याचे सूचित करुनही त्यांनी तसे न करता तिचा मृतदेह गावी नेल्याचे सांगण्यात आले आहे. मृत महिलेची प्रकृती मंगळवारपासून उलटी व जुलाब होत असल्याने अस्वस्थ होती असे महिलेसोबत आलेल्या व्यक्तीनी सांगितल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. नागरिकांनी घटनेबाबत कोणतीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.