नंदुरबार : उत्सवांमधील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातील बाप्पांच्या मूर्ती यंदाही लहानच अर्थात चार फुटापर्यंतच राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचा सुरू असलेला कहर, तिसऱ्या लाटेची व्यक्त करण्यात येणारी भीती यामुळे गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या मूर्ती तयार करण्यास नंदुरबारातील मूर्ती कारागीर धजावत नसल्याची स्थिती आहे. येथील मूर्ती कारखान्यांमधील लगबग उत्सवाच्या सहा महिने आधीपासून सुरू होते. यंदा मात्र अद्यापही शांतताच असल्याचे चित्र आहे.
नंदुरबारचा गणेशोत्सव आणि येथील मूर्तिकला राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथील ३० पेक्षा अधिक मूर्ती कारखान्यांमधून पाच ते २० फुटाच्या पाच हजारांपेक्षा अधिक मूर्ती तयार होतात. येथील मूर्तिकला पेणच्या मूर्तिकलेच्या तोडीची आहे. राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश येथील शेकडो गणेश मंडळे येथून मूर्ती नेत असतात. शिवाय युएई, दक्षिण आफ्रिका येथेही यापूर्वी नंदुरबारच्या गणेशमूर्ती गेलेल्या आहेत.
कारखान्यांमध्ये शांतता
n नंदुरबारातील मूर्ती कारखाने मार्च महिन्यांपासून सुरू होतात. त्यातून शेकडो जणांना रोजगार मिळतो. यंदा मात्र अजूनही कारखान्यांमध्ये शांतता आहे. कारागीर केवळ चार फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती तयार करीत आहेत. घरगुती उत्सवासाठी असलेल्या या मूर्तींसाठी स्वत: कारागीरच मेहनत घेत आहेत. त्यामुळे मजुरांना कारखान्यांमध्ये रोजगार नसल्याचे चित्र आहे.
लाखोंची उलाढाल
ठप्प होणार?
n गणेशमूर्ती खरेदी-विक्रीतून शहरात लाखोंची उलाढाल होते. अनेकांना रोजगार मिळतो. गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही ही उलाढाल ठप्प राहते की काय? याबाबत चिंता आहे. बाप्पांच्या कृपेने कोरोनाचा कहर कमी झाल्यास उत्सव साजरा करण्यास मोकळीक राहील, अशी अपेक्षा मूर्ती कारागीर व्यक्त करीत आहेत.
कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाचे काय आदेश असतील, याबाबत संभ्रम आहे. शिवाय गेल्यावर्षी तयार करून ठेवलेल्या ५ ते २० फूट उंचीच्या मूर्ती कारखान्यातच आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या मूर्ती तयार करीत नाहीत. घरगुती उत्सवासाठी चार फूट उंचीच्या मूर्तीच सध्या या कारखान्यांमध्ये तयार केल्या जात आहेत. बाप्पांच्या कृपेने सर्व काही ठीक झाले, तर मूर्ती कारागीरांनाही पूर्वीचे वैभव प्राप्त होईल.
- दिलीप चौधरी,
मूर्ती कारागीर, नंदुरबार.