लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्नपत्रिकेवर तारीख वाचता येत नसल्याच्या रागातून वाकीपाडा येथील एकाने पत्नीला पेटवून देत खून केला होता़ २०१८ मध्ये घडलेल्या घटनेत नंदुरबार सत्र व जिल्हा न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़फेब्रुवारी २०१८ मध्ये वाकीपाडा ता़ नवापुर येथील यूसूफ फारुख सोनगडीया याने पत्नी शबाना हिला नातेवाईकाकडून आलेली लग्नपत्रिका वाचण्यास दिली होती़ यावेळी पत्नीला लग्नाची तारीख सांगता आली नाही़ यातून त्याने पत्नी शबाना हिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती़ दरम्यान पत्नीला हाकलूनही दिले होती़ परंतू शबाना ही प्रतिकार करत घरात परतली़ याचा राग येवून युसूफ याने शबाना हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते़ यानंतर पिडित महिलेने बाथरुममध्ये जावून स्वत:ची आग विझवत दवाखाना गाठला होता़ याठिकाणी उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यूसूफ सोनगडीया याच्याविरोधात सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दोषारोपत्र दाखल केले होते़ नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष भागवत यांच्या कोर्टात हा खटला सुरु होता़ आरोपी यूसूफ यास जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती भागवत यांनी सुनावली़ सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड़ सुशील पंडीत यांनी काम पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नितीन साबळे व गिरीष पाटील यांनी काम पाहिले़
पत्नीला वाचता येत नसल्याने पेटवून देत केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:12 IST