नंदुरबार : शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी 48 लाख रोप लागवडीचे लक्ष्य असताना 51 लाख वृक्ष रोवण्यात आले होत़े अद्याप दुष्काळाची झळ पोहोचली नसल्याने सर्वच ठिकाणी रोपे सुस्थितीत आहेत़ यात नंदुरबार तालुक्यातील दोन लाख रोपांचा समावेश असून या रोपांचे संवर्धन करण्यासाठी वनविभाग पाण्याचे नियोजन करत आह़े 1 जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुरूवात झाल्याच्या 25 दिवसात जिल्ह्यात 51 लाख खड्डे निर्मिती करण्यात येऊन 45 लाख 85 हजार 209 झाडांची लागवड करण्यात आली होती़ वनविभागाने तालुका आणि ग्रामीण स्तरावर पुरवठा केलेल्या या वृक्षांच्या संगोपनासाठी वनविभागानेच मोलाची भूमिका बजावल्याने नंदुरबार तालुक्यातील नागरिकांना दुष्काळातही दिलासा मिळाला आह़े तालुक्यातील अंबापूर, खोक्राळे, ठाणेपाडा, अंबापूर आणि वांजळा वनक्षेत्रात 130 हेक्टरवर लागवड केलेल्या 2 लाख 55 हजारपैकी 2 लाख 9 हजार झाडे सुरक्षित आहेत़ वनविभागाकडून झाडांची लागवड केल्यानंतर पाऊस आल्यानंतर चर पद्धतीने वृक्षांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येत़े यंदाही समतल चरांची कामे करण्यात आली होती़ परंतू यंदा नंदुरबार तालुक्यात पावसाने पुरेशा प्रमाणात हजेरी न लावल्याने वनविभागाने प्रथमच झाडांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आह़े यांतर्गत सर्व पाच लागवड क्षेत्रात झाडांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत़ यात प्रामुख्याने वनविभागाकडून प्रत्येक झाडाजवळ खड्डा करुन निरुपयोगी ठरणा:या बाटल्यांद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न होणार आह़े यासाठी वनविभागाकडून कामकाज करण्यात येत आह़े तालुक्यात यंदा दुष्काळी स्थिती आह़े रोहयोच्या माध्यमातून हा उपक्रम करण्याचा विभागाचा प्रयत्न असून यातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळून टाकाऊ बाटल्यांचा प्रश्न मार्गी लागणार आह़े या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी वनविभागाचे कर्मचारी घेणार असल्याचे सांगण्यात आले आह़े अंबापूर येथील 25 हेक्टरच्या मिश्र रोपवनात 62 हजार 500 पैकी 51 हजार 815, खोक्राळे येथील 30 हेक्टर मिश्र रोपवनात 75 हजार पैकी 68 हजार 250, ठाणेपाडा येथील 25 हेक्टरवरच्या साग रोपवनात 62 हजारपैकी 42 हजार 500, अंबापूर येथील 25 हेक्टरच्या मिश्र रोपवनात 27 हजार 500 पैकी 23 हजार 375 तर वांजळा येथील 25 हेक्टर वनक्षेत्रातील 27 हजार 500 झाडांपैकी 23 हजार 650 झाडे ही सुस्थितीत असल्याची माहिती देण्यात आली आह़े एकूण 82 टक्के रोपे जिवंत असल्याने वनविभागाकडून त्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत़ येत्या 10 दिवसानंतर तशी कारवाई सुरु होणार असल्याची माहिती आह़े प्रारंभी ठाणेपाडा येथील साग आणि खोक्राळे येथील मिश्र रोपवनात बॉटलद्वारे पाणी देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आह़े यासाठी पाणी वाहून नेणारे टँकर, पाण्याचा स्त्रोत आणि त्यासाठी लागणारा खर्च याची जुळवाजुळव विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती आह़े
नंदुरबार तालुक्यात दोन लाख रोपांना वनविभाग देणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 11:49 IST