शुभारंभाआधीच जलकुंभाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:22 PM2020-06-29T12:22:56+5:302020-06-29T12:23:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या जलकुंभातून शनिवारपासून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार ...

Water hyacinth leaks before launch | शुभारंभाआधीच जलकुंभाला गळती

शुभारंभाआधीच जलकुंभाला गळती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीनच बांधकाम करण्यात आलेल्या जलकुंभातून शनिवारपासून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र या जलकुंभात पाणी भरले असता तो चारही बाजूंनी लिकेज झाल्याने वरून पाणी पडू लागल्याने एकच धावपळ उडाली. नवीन बांधलेला जलकुंभ सुरुवातीलाच लिकेज झाल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे असेल याचा अंदाज येतो.
सविस्तर वृत्त असे की, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नंदुरबार यांच्या देखभाल दुरुस्ती या योजनेअंतर्गत प्रकाशा येथे सुमारे २४ लाख रुपये खर्च करून नवीन जलकुंभ बांधण्यात आला. हे काम महिनाभरापूर्वी पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रकाशा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. उपअभियंता पाणीपुरवठा शहादा व शाखा अभियंता पाणीपुरवठा पंचायत समिती शहादा यांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले आहे. मात्र प्रकाशा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाल्यानंतर ग्रामपंचायतीने शनिवारपासून या जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी उपसरपंच भरत पाटील यांनी दोन दिवस त्याठिकाणी थांबून जुन्या जलकुंभाची जलवाहिनी नवीन जलकुंभाकडे वळवून ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र जसजसे नवीन जलकुंभात पाणी पडू लागले तसतसा जलकुंभ चारही बाजूने लिकेज सुरू झाले. पूर्ण भरल्यानंतर वरपासून खालपर्यंत त्या टाकीचा चारी बाजूंनी ठिकाणी पाणी खाली पडू लागले. वरून खाली पाण्याचे तषारे उडू लागले. यामुळे आजूबाजूच्या घरांवर पाणी पडू लागल्याने घरांना धोका निर्माण झाला. विशेषत: पहिल्याच दिवशी गळती लागल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून आले. विशेष म्हणजे जलकुंभाची पूर्ण चाचणी बाकी असताना संबंधित ठेकेदाराला पैसे अदा झाल्याचे कळते. जर कामच बरोबर नसेल तर कामाचे पैसे अदा झालेच कसे? हा प्रश्नही सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. या चुकीच्या कामामुळे ग्रामस्थांना गेल्या दोन दिवसापासून पाण्यासाठी अडचण येत आहे. पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे आणि पहिल्या दिवशी झालेल्या लिकेजमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. जर या कामासाठी दोन अभियंत्यांची नियुक्ती असताना हे काम असे झालेच कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तेव्हा वरिष्ठांनी याची दखल घेत या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

प्रकाशा येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग नंदुरबार यांच्या जिल्हा देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. शनिवारी शुभारंभ करण्यासाठी जलकुंभात पाणी टाकले असता चारही बाजूने गळताना दिसून आला. जलकुंभाचा तळ, मध्यभागी चार ते पाच ठिकाणी गळती आहे. यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे यावरून कळते. जर यावर निरीक्षण करणारे उपअभियंता व शाखा अभियंता होते तर मग हे काम ठेकेदाराकडून झाले कसे. म्हणून या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
-रामचंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य, प्रकाशा.

Web Title: Water hyacinth leaks before launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.