लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नेहमीच्या पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी शहादा तालुक्यातील 71 गावातील ग्रामस्थांनी गावे पाणीदार करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, 20 गावांमध्ये प्रत्यक्ष श्रमदानातून कामांना सुरूवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून शहादा तालुक्यात पर्यन्यमान कमी झाल्याने अनेक गावे पाणी टंचाईच्या समस्येने ग्रस्त झाली आहेत. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना जंगलात पायपीट करावी लागते. पाणी टंचाईच्या या समस्येतून गाव मुक्त करण्यासाठी आता ग्रामस्थांनीच पुढाकार घेवून जलसिंचनाच्या कामांसाठी कंबर कसली आहे. यंदा तालुक्यातील 71 गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असून, गेल्या वर्षी 58 गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या वर्षीदेखील श्रमदानातून बंधारे, शेततळे, विहिरी पुनर्भरण आदींची असंख्य कामे झाली होती. मात्र गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने त्याचा उपयोग झाला नाही.जमिनीचा समतल स्तर, बंधारे, शेततळे, विहिरी पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्षसंवर्धन अशी अनेक कामे श्रमदानातून गावोगाव सुरू असल्याने यंदा चांगला पाऊस झाल्यास ग्रामस्थांनी केलेल्या श्रमाचे चिज होणार आहे. भविष्यात गावाला पाणी टंचाईशी सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येक गावातील 90 ते 100 ग्रामस्थ श्रमदान करीत आहे. श्रमदानाबरोबर सहा यंत्रांचीही मदत घेण्यात येत आहे. कवठळ येथे तर रोज रात्री सात ते 12 वाजेर्पयत ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. वॉटर कप स्पर्धेतचे जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले, तालुका समन्वयक गुणवंत पाटील व तृषाल तायवाडे हे श्रमदानाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत आहेत. ग्रामस्थांच्या अथक श्रमदानातून गावे पाणीदार होतील आणि भविष्यात तालुक्यातील पाणी टंचाईचे संकट कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
शहादा तालुक्यात 20 गावात श्रमदानातून जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:22 IST