जयनगर : शहादा तालुक्यात दोन आठवड्यांहून जास्त कालावधी उलटला तरी दोन-चार गावे वगळता संपूर्ण तालुक्यात अजूनही पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेची भर पडली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे अशीच परिस्थिती असताना शहादा तालुक्यात हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही ठिकाणी तर अजून पेरणीलासुद्धा सुरुवात झालेली नाही.
जूनच्या पहिल्या आठवड्यात शहादा तालुक्यात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी केली होती. नंतर १० ते १२ दिवस होऊनही पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे व लागवडीचे संकट ओढवले होते. दुबार पेरणी व लागवड झाल्यावर आता पुन्हा दोन आठवड्यांचा कालावधी उलटून पाऊस न आल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे, तर जुलै महिन्यात आजच्या दिवशी दोन-तीन ठिकाणे वगळता इतर गावांमध्ये एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे सुरुवातीला पेरणीची कामे आटोपलेल्या शेतकऱ्यांवर पाऊस नसल्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर काही शेतकऱ्यांनी अगोदरच दुबार पेरणी व लागवड केली असून, त्यांच्यावर तिबार पेरणी व लागवडीचे संकट ओढवले आहे.
शहादा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवसांत सर्वत्र पाऊस न झाल्यास६ दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकचा आधार असल्याने ते पिके तग धरून आहेत. मात्र त्यांची वाढ खुंटली आहे. तर कोरडवाहू क्षेत्रातील पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून, ती पावसाअभावी करपू लागली आहेत. दोनदा महागडी बियाणे खरेदी करून केलेल्या पेरण्या व लागवड वाया जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत रूतला आहे.
कापूस, मका, ज्वारी, पपई, ऊस, मिरची, केळी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. कर्ज काढून लागवड व पेरणी केली असून, कर्जाचे पैसे फेडायचे कसे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने दुबार पेरणी ओढवलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच कृषी विभागाने पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकरी वर्गाकडून होत आहे.