लोकमत न्यूज नेटवर्कवडाळी : शहादा तालुक्यातील वडाळी ते काकरदा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार कोटी रूपये खर्च करून गेल्या दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. परंतु वडाळी गावालगत असलेल्या रंगुमती नदीवर त्याअगोदरच पूल बांधणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करीत रस्ता काम करण्यात आले. या नदीला पावसाळ्यात पूर येत असल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत असते. त्यामुळे या नदीवर त्वरित पूल बांधण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.तालुक्यातील छोटी गावे मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी खासदार डॉ.हीना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या प्रयत्नाने शासनाच्या गाव तेथे रस्ता योजनेंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नव्याने चार कोटी रूपये खर्च करून वडाळी ते काकरदा खुर्द रस्ता तयार करण्यात आला.या रस्त्याच्या कामामुळे काकरदा व अभाणपूरचे अंतर वडाळीपासून फक्त सहा किलोमीटरने कमी झाल्याने या दोन्ही गावातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी वडाळी येत असल्याने या रस्त्यामुळे खरोखरच विकासाला चालना मिळाली आहे. परंतु रंगुमती नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या नदीला पूर येत असल्याने या दोन्ही गावांचा दोन ते तीन महिन्यांसाठी संपर्क तुटतो. त्यामुळे काकरदा येथील नागरिकांना पुन्हा १५ किलोमीटरचा फेरा मारून वडाळी व तोरखेडा येथे बाजार पेठेत यावे लागत असते. तसेच वडाळी येथील अनेक शेतकऱ्यांची शेतीही नदी पलिकडे असल्याने शेतकऱ्यांना नदीच्या प्रवाहात उतरून पलिकडे जावे लागते. अशातच पाण्याचा जोरदार प्रवाह आल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देवून त्वरित रंगुमती नदीवर पूल उभारावा, अशी मागणी वडाळीसह काकरदा, अभाणपूर व परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.या नदीवर पूल उभारण्यात यावा यासाठी अनेकदा संबंधित विभागाकडे निवेदनेदेखील देण्यात आले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रक्रिया उमटत आहेत. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून रंगुमती नदीवर त्वरित पूल उभारण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वडाळी-काकरदा रस्ता पावसाळ्यात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:45 IST