लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या विधानसभा निवडणुकीतील बहुतेक उमेदवार त्याच पक्षात असून लहान पक्षातील उमेदवारांनी पक्षबदल केले आहेत. अपक्ष आणि इतर उमेदवार मात्र पाच वर्षात कुठेही चर्चेत दिसून आले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून कमाल 12 व किमान आठ उमेदवार होते. त्यात नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 12 उमेदवार, नंदुरबार मतदारसंघात सर्वात कमी अर्थात आठ, अक्कलकुवा मतदारसंघात नऊ तर शहादा मतदारसंघात 11 उमेदवार होते. चारही मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले होते. काँग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे उमेदवार पक्षात कायम आहेत. मनसे आणि त्यांचे उमेदवारही पाच वर्षात कधी चर्चेत आले नाहीत. नंदुरबार मतदारसंघात चार प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमध्ये भाजप, काँग्रेसचे उमेदवार आपापल्या पक्षातत सक्रीय राहिले. शिवसेनेचे विरेंद्र वळवी यांनी शिवसेनेशी दुरावा राखला आहे. क्वचीत प्रसंगी ते सेनेसोबत दिसून आले. मनसेचे गुलाबसिंग वसावे हे दिवंगत झाले. राष्ट्रवादी, बहुजन मुक्ती पार्टी आणि दोन अपक्ष उमेदवार देखील फारसे चर्चेत राहीले नाहीत.शहादा मतदारसंघात 11 उमेदवारांपैकी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवार सक्रीय राहिले. परंतु शिसेनेतर्फे निवडणूक लढविणारे सुरेश नाईक नंतर कधीच सेनेच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. तीच स्थिती मनसेच्या किसन पवार यांची. माकचे जयसिंग वळवी पक्षाच्या व्यासपीठावर कायम दिसून आले. तर इतर उमेदवार फारसे चर्चेत दिसून आले नाहीत. नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 12 उमेदवार होते. पैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आपापल्या पक्षात सक्रीय होते. भारिपचे अजरूनसिंग वसावेही अधूनमधून काही आंदोलनात दिसून आले. मनसे, शिवसेना आणि अपक्ष उमेदवार फारसे चर्चेत किंवा पक्षाच्या व्यासपीठावर दिसून आले नाहीत.अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आपल्या पक्षात सक्रीय राहिले. तर राष्ट्रवादीचे विजयसिंग पराडके यांनी भाजपची मोट धरली. भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष लढणारे डॉ.नरेंद्र पाडवी हे भाजपच्या व्यासपीठावर सक्रीय राहिले. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार फारसे दिसून आले नाहीत.
Vidhan Sabha 2019 : प्रमुख उमेदवार आपापल्या पक्षात सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:42 IST