नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही लसीकरणासाठी निरूत्साही असलेल्या आदिवासी भागात उत्साह भरण्यासाठी विविध सोंग घेऊन जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहे. विशेषत: आदिवासी भागातील लोकप्रिय असलेल्या सोंगाड्या पार्ट्यांनी ग्रामीण भागात चांगला रंग भरला आहे. त्याला वासुदेव, भाेलेनाथाचे सोंग घेवून होणारी जनजागृती आणि जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारूड यांच्या बोलीभाषेतील ध्वनी फितींनीही भर घातली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात सध्या आदिवासी भागात लसीकरणाला वेग आला आहे.
कोरोना निर्मूलनासाठी लसीकरण हेच प्रभावी उपचार असल्याने देशभरात लसीकरण मोहिम जोरदार सुरू आहे. मात्र आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एक ना अनेक कारणांनी लोक लसीकरणापासून लांब होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यात लसीकरणाला वेग यावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्वत: भेट देवून या भागातील आदिवासींशी संवाद साधला आणि ‘आपण स्वत: लस घेतली आहे, आपणही घ्या’ असे आवाहन केले. त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यसचिव व आरोग्य विभागाचे प्रधान सचिवही होते. लस सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याचाही परिणाम झाला नाही. याभागात साक्षरतेचे प्रमाण कमी, त्यातच विविध अफवा आणि अंधश्रद्धेचाही प्रभाव त्यामुळे लसीकरणासाठी लोक धजावत होते. त्यावर पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने बोलीभाषेत लोकजागृतीचा उपक्रम सुरू केला. विशेषत: जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारूड हे याच परिसरातील असल्याने त्यांना आदिवासी व अहिराणी भाषा बोलता येतात. त्यामुळे त्यांनी बोलीभाषेतील ध्वनी फिती प्रसारीत केल्या. खासदार डाॅ.हीना गावीत यांनीदेखील आदिवासी बोलीभाषेत जनजागृती केली. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता ही मोहीमच सुरू झाली. त्यासाठी आदिवासी भागात प्रसिद्ध असलेल्या सोंगाड्या पार्ट्यांचा आधार घेण्यात आला. सोंगाड्या पार्ट्या म्हणजे लोकनाट्यातून प्रबोधन करणारे कला पथक. आदिवासींच्या सांस्कृतीक जीवनात आणि मनोरंजनासाठी सोंगाड्या पार्ट्यांचे महत्त्व आहे. शासनाच्या कुठल्याही योजनांच्या प्रसारासाठी या भागात त्यांची मदत घेतली जाते. लसीकरणासाठीही या सोंगाड्या पार्ट्यांनी गावोगावी रंग भरला असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेगही वाढला आहे.
सोंगाड्या पार्ट्यांबरोबरच बीगर आदिवासी भागात वासुदेव, भोलेनाथाचे सोंग घेऊन काही शिक्षक लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी भजन व भाव गीतांचाही वापर होत आहे. एकूणच सूर, संगित आणि लोकनाट्ट्यातून लोकांना लसीकरणाबाबत जागृत करण्याचे प्रयत्न जिल्ह्यात सुरू आहे.
लस टोची लेऊला...
या जनजागृतीसाठी अनेक सोंगाड्या पार्ट्या पुढे आल्या आहेत. एका दिवसात प्रत्येक सोंगाड्या पार्ट्यांतर्फे चार ते पाच गावांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. त्यात बोलीभाषेतून गीत, नाट्य आणि मनोरंजनातून लोकांना ते प्रबोधन करतात. ‘लस टोची लेऊला, आपू परिवार सुरक्षित राखूला’यासह अनेक गाणे या कलाकरांनी हिंदी सिनेमाच्या चालींवर बसविले आहेत.
गेल्या आठवडा भरापासून आपण लसीकरणासाठी गावो गावी सोंगाड्या पार्टीच्या माध्यमातून जनजागृती करीत आहोत. आतापर्यंत १५ गावात कार्यक़्रम केले असून, लोाकंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण कार्यक्रम केलेल्या गावांमध्ये लसीकरण शिबिरालाही लसीकरणासाठी लोकांची गर्दी होत आहे. - राजू गावीत, कळवण, ता.नवापूर