तळोदा : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची भुमिका मांडण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे लोकमंच हा उपक्रम शहादा तालुक्यातील (वाडी) जीवननगर पुनर्वसन वसाहतीत घेण्यात आला. सरदार सरोवर विस्थापित मणिबेली पासून भादलपर्यंतच्या सर्व ३३ गावातील मुख्य प्रतिनिधी, ११ पुनर्वसन वसाहतींचे जवळपास दीड ते दोन हजार नागरिक उपस्थित होते.भाजप उमेदवाराच्या वतीने डॉ.कांतीलाल टाटीया, काँग्रेस उमेदवाराच्या वतीने माजी मंत्री पद्माकर वळवी, भारतीय ट्रायबल पार्टीच्या उमेदवाराच्या वतीने प्रमोद नाईक तसेच गावगावचे मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक मेधा पाटकर व ओरसिंग पटले यांनी केले.डॉ.कांतीलाल टाटिया व अॅड.पद्माकर वळवी यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. यानंतर उपस्थित लोकांनी गावगावातले मुख्य प्रश्न विचारले त्यात नर्मदेच्या विस्थापितांचे पुनर्वसन झाले आहे का? नसल्यास धरणाचे लोकार्पण कसे झाले?, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात ज्यामुळे वनांवरून ११ लाख आदिवासी कुटूंबाना स्वत:च्या जमिनीवरून हाकलून लावण्याचा निर्णय दिला? त्याबद्दल दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना काय वाटतं? अहिंसक आंदोलनावर खोट्या केसेस करून ३०७ चे खोटे कलम लावून १९९५ ची आंदोलनाची केस उकरून आंदोलनातील कार्यकर्ते व विस्थापित आदिवासीला होळीच्या आदल्या दिवशी अचानकपणे अटक कशी केली?हे योग्य आहे का?, मध्यम प्रकल्पासंदर्भात नर्मदेचे पाणी गुजरातला देऊन टाकण्याचा निर्णयाबाबतची काय भूमिका आहे?, मूळ गाव व पुनर्वसन वसाहतीतील आरोग्य दवाखाने, त्यातील रिक्त पदे, व मूलभूत सोयीसुविधा आजपर्यंत का दिल्या गेल्या नाहीत?, २५ वर्षांपासून चालत असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान संचालित नर्मदेच्या जीवनशाळांना आजपर्यंत अनुदान का दिले नाही?, जीवनशाळांना सर्व शिक्षा अभियान का लागू केले जात नाही?, धरणाच्या बॅकवॉटर मुळे सावऱ्या दिगर तसेच इतर टापू क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात तसेच सावºया दिगरच्या पुलाचे बांधकाम गेल्या १० वर्षांपासून ठप्प का आहे?, नर्मदेच्या जलाशयावर ठेका नेमका कुणाचा व मत्स्यसंघ बनण्याचे अधिकार विस्थापिताना मिळालेच पाहिजे?याबद्दलची भूमिका, जातीचे दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र यात येणाºया अडचणी. पक्षांच्या जाहीरनाम्यात ग्रामस्वराज्याची व्याख्या, अयोध्या मंदिर प्रश्न, पुलवामा हल्ला संदर्भात हिंसेसंदर्भात नेमक्या भूमिका.असे विविध प्रश्न विस्थापित आदिवासींकडून तसेच इतर लोकांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून आलेल्या प्रतिनिधींना केले. त्यावर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सविस्तरपणे उत्तरे दिली.आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी समारोप केला व १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
‘लोकमंच’मध्ये विस्थापितांनी मांडले विविध प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:54 IST