शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील सरस्वती शिशुवाटिका, सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर व मुक्ताई माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे शैक्षणिक समन्वयक प्रा. डी.सी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सचिव मुक्ताबाई पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे कोविड-१९ च्या नियमांमुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उपस्थित राहत या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यात नर्सरीच्या मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
कुबेर विद्यालय, म्हसावद
म्हसावद, ता. शहादा येथील कुबेर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे संचालक मधुकर दशरथ पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अंबालाल अशोक पाटील, उपाध्यक्ष सुरेश नथ्थू पाटील, सचिव सुधाकर बुला पाटील, संचालक मनिलाल गणेश पाटील, रमाकांत पुरुषोत्तम पाटील, भगवान उत्तम पाटील, माजी प्राचार्य मुरलीधर मक्कन पटेल, ईश्वर उत्तम पाटील, मुख्याध्यापक मनोज अशोक पाटील, उपमुख्याध्यापक प्रा. पी.एम. पटेल, पर्यवेक्षक ए.सी. पाटील, प्राथमिक, सातपुडा छात्रालय व विद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी तंबाखूविरोधी शपथ घेत परिसरात वृक्षारोपण केले. सूत्रसंचालन प्रवीण देसले यांनी केले.
पालिका शाळा क्रमांक ९-१६, शहादा
शहादा शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक नऊ व १६ च्या आवारात शहादा फर्स्ट प्रतिष्ठित नागरिकांतर्फे हरितक्रांती सामूहिक शपथ विधी व श्रमदानाचा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यात सातत्याने सहभाग घेणाऱ्या नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्रांत अधिकारी डाॅ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, प्रा. लियाकत सय्यद, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाले, नगरसेवक संदीप शंकर पाटील, माजी नगरसेवक राकेश पाटील, अजय शर्मा, डॉ. वसंत पाटील, प्रीती पाटील, महिला कार्यकर्त्यांसह विविध संघटनांचे सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रथमत: सर्वांनी शहरात पूर्णतः हरितक्रांती राबवण्यासाठी सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर आवारात श्रमदानाच्या माध्यमातून काटेरी झाडे, झुडपे काढून साफसफाई करण्यात आली. ज्यामुळे पूर्ण परिसर स्वच्छ झाला. याच आवारात जिल्ह्यातील सर्वात मोठे ग्रंथालयाचे काम सुरू आहे, जे अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी शहादा फर्स्टच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नंतर सामूहिक बैठक होऊन शहरातील आरोग्य व वाहन पार्किंगबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन केले.
हि.गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार : भारतीय स्वातंत्र्य दिनी येथील हि.गो. श्रॉफ हायस्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन ॲड. रमणलाल शाह यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेत अव्वल गुणांकन प्राप्त केलेल्या यशस्वितांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करण्याबाबत जाहीर केलेल्या नियमावलीला अनुसरून शालेय परिसरात स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन ॲड. शाह,मुख्याध्यापिका सुषमा शाह, लायन्स क्लबचे पदाधिकारी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.
इयत्ता दहावीत प्रथम आलेली विद्यार्थिनी उन्नती राकेश कलाल, द्वितीय देवेंद्र भगवान मोरे, तृतीय रोहन नीलेश त्रिवेदी व गुजराती विभागातील वृत्ती प्रवीण भानुशाली, द्वितीय दर्शन दिलीप व्यास, मुकेश हिरा पुरोहित व तृतीय सुजल रमेश पाटील तसेच इयत्ता बारावीत विज्ञान विभागातील प्रथम निकिता अनिल वाघ, द्वितीय भावना विजय सोनार, तृतीय राजश्री आनंदा बेडसे, कला विभागात प्रथम देवयानी नाना गिरासे, द्वितीय अनिता जगजीतसिंग पाडवी, तृतीय मनीषा कैलास खैरनार आली. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्राथमिक विभागातील शिक्षिका शीतल अजबे यांनी ‘भगवान जेल मे है’ हे सामाजिक व धार्मिक प्रबोधनपर कथाकथन सादर केले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू निषिद्धची शपथ उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना सीमा पाटील यांनी दिली.
राष्ट्रभक्तीपर गीतगायन अनघा जोशी यांच्या गीतगायन पथकाने सादर केले. त्यांना प्रसन्न दाऊतखाने, ऋतुपर्ण डांगे यांनी सिंथेसायझर व तबला वाद्यांची साथ दिली.
राष्ट्रगीत गायन कलाशिक्षक हेमंत पाटील यांच्या ३० विद्यार्थ्यांच्या बासरी पथकाने केले. शिक्षक नरेंद्र सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
२० विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तीपर गीतांचे वादन केले. परेड संचलन धून सादर केली. यासाठी जावेद धोबी, राजेंद्र मराठे, गिरीश चव्हाण, किशोर रौंदळ यांनी परिश्रम घेतले.
स्वातंत्र्य दिन औचित्याचा आशय असलेले फलक लेखन कला शिक्षक महेंद्र सोमवंशी, शिवाजी माळी यांनी केले. त्यांना जगदीश वंजारी, हेमंत लोहार, जितेंद्र बारी यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय उत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, दिनेश ओझा, सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निवेदिका सीमा पाटील, तर आभार भिकू त्रिवेदी यांनी मानले.