नंदुरबार शहरातील प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात जागतिक महिला दिनानिमित्त विधवा कर्तबगार आदर्श माता भगिनी, बचत गटातील भगिनी व शालेय परिवारातील सर्व भगिनींचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली शिंदे, शालेय समितीच्या सदस्या मंजूबेन जैन, माजी शिक्षिका शोभा रामोळे, ज्येष्ठ शिक्षिका करुणा महाले, बालमंदिर विभागाच्या भगिनी मनीषा खलाणे उपस्थित होत्या. मुख्याध्यापक राहुल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विधवा पण कर्तृत्वान माता, बचत गटातील भगिनी, प्राथमिक व बालमंदिर विभागातील सर्व भगिनींचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी वैशाली शिंदे यांनी आजच्या समाजातील स्त्रियांचे स्थान व घेतलेली भरारी यावर तर मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी स्त्रियांविषयी आजचा बदललेला दृष्टिकोन यावर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुनील वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन सोनल वळवी तर आभार स्मिता माळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार
नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात महिला दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.व्ही.एस. श्रीवास्तव होते. त्यांनी महिला ही आजच्या काळात अबला नसून सबला झालेली आहे. पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रगतीच्या वाटेवर चालत आहे, असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी उपस्थित होते. या वेळी उपप्राचार्य एन.जे. सोमानी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे तर आभार एन.आर. कोळपकर यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या वेळी महाविद्यालयाच्या वतीने सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कोरोनाविषयीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
के.डी. गावीत विद्यालय, इसाईनगर
नंदुरबार तालुक्यातील इसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.डी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षक ए.डी. खेडकर उपस्थित होते. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक बी.जे. जावरे, एम.आर. वसावे, एम.व्ही. वसावे, ए.टी. नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.व्ही. विसपुते तर आभार प्रा.एस.आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी सी.डी. जाधव, एम.डी. पेटकर, आर.एस. पाडवी यांनी परिश्रम घेतले.