नंदुरबार येथील माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त माता-पिता पूजन करण्यात आले होते.
मनुष्याच्या जीवनात गुरूला मोठं आणि महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. ‘गुरु विना ज्ञान नाही’ असे म्हटले जाते. ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले आई-वडील पहिले गुरू आहेत. ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरूचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमासाठी माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वृषाली पाटील, पूर्णिमा कासार, मोहिना घाटमोडे, ओजस्विनी सोनवणे, माधुरी माळी, तमन्ना पिंजारी यांनी परिश्रम घेतले.
साईबाबा मंदिर, नंदुरबार
नंदुरबार शहरातील पोलीस लाईनमधील साईबाबा मंदिरात नगरसेवक यशवर्धन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते सपत्नीक महाआरती करण्यात आली. कोरोनामुळे शासन आदेशान्वये प्रार्थनास्थळे बंद आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात मंदिरांमध्ये मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यंदाही उत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. कोणत्याही ठिकाणी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. या वेळी इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता मनोज रघुवंशी यांच्यासह भाविक उपस्थित होते.