लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर/खांडबारा : वेळेवर रुग्णावाहिका आली नाही व उपचार मिळाला नाही यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने रुग्णवाहिका चालकाला मारहाण करीत खांडबारा रुग्णालयात तोडफोड केल्याची घटना खांडबारा येथे सायंकाळी घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भादवड येथील वृद्ध विजयसिंग वळवी हे विहिरीत पडले होते. त्यांना काढण्यासाठी गेलेल्या शरद सोना नाईक या तरुणाला विहिरीत डोक्यास दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली परंतु ती उशीरा आली. रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषीत करताच संतप्त जमानाने रुग्णवाहीका चालकाला मारहाण केली. शिवाय रुग्णालयातील सामान आणि औषधींचीही फेकाफेक करून तोडफोड केली. साधारणत: २०० ते ३०० चा जमाव होता. रुग्णवाहिका उशीरा आल्याने व उपचार न केल्यानेच युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी जमावाने केला.विसरवाडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सहायक निरिक्षक संदीप पाटील व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोये यांनी भेट दिली. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
खांडबारा रुग्णालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:06 IST