लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : दुर्गम भागात पावसाळ्यात सर्पदंशावरील लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहत नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे या भागातील सर्व आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात सर्पदंशावरील लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय सारंगखेडा व प्रकाशासाठी तातडीने नवीन बोट घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आपत्ती निवारण आढावा बैठकीत बोलताना दिल्या. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, आरोग्य, दळणवळण यासह इतर तयारींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी वान्मती सी., विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, तहसीलदार नितीन पाटील, मनोज खैरनार, जिल्हा आरोग्य अधिकारी एन.डी. बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत पावसाळ्यात अचानक उद्भवणा:या स्थितीत काय उपाययोजना आहेत याचा विविध विभागांकडून आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेऊन त्यादृष्टीने काय व कसे नियोजन करता येईल याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.सर्पदंशावरील लसपावसाळ्यात दुर्गम भागात अर्थात नर्मदा काठावरील गावात मोठय़ा प्रमाणावर सर्पदंशाचे प्रकार घडतात. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात वेळेवर सर्पदंशावरील लस उपलब्ध होत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता यंदा सर्पदंशावरील लस किती व कशा प्रमाणात उपलब्ध आहेत याचा आढावा घेण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिका:यांनी सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असल्याचे सांगितले. याशिवाय वॉटर अॅम्ब्युलन्समध्येदेखील उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला सर्व तहसीलदार, सर्व पालिकांचे मुख्याधिकारी, बांधकाम, दूरसंचार, आरोग्य, जलसिंचन, पाटबंधारे यासह इतर विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
दोन लाईफ बोटींची नव्याने खरेदी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:55 IST