लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यातील भोगवाडे खुर्द शिवारातील शेतात तुटून पडलेल्या वीज वाहिनीवर पाय पडल्याने शेळ्या चारणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. घटनेत मुलींसह तीन शेळ्याही ठार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. हर्षला टेट्या पावरा (१३) व आरती देवसिंग पावरा (१४) अशा दोघी रा. भोगवाडे खुर्द अशी मृत मुलींची नावे आहेत. दोघीही रविवारी सकाळी शेळ्या चारण्याासाठी गेल्या होत्या. दरम्यान याठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात वीज कंपनीच्या पोलवरून कृषिपंपासाठी देण्यात आलेल्या जोडणीची वीजतार तुटून पडली होती. त्यात वीजप्रवाह सुरू होता. यादरम्यान दोघी मुली शेळ्यांसह गेल्या असता, आधी तीन शेळ्या व त्यानंतर दोघींना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या जागीच मृत झाल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्नही केला. परंतु तोवर दोघी मुली दगावल्या होत्या. गावातील रहिवासी विजय पावरा यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पथक येथे दाखल झाले होते. दरम्यान सोमवारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या सूचनेने पशुवैद्यकीय पथक याठिकाणी दाखल झाले होते. रविवारी झालेल्या घटनेची माहिती धडगाव पोलीस ठाण्यापर्यंत पाेहोचण्यास उशीर झाला होता. यातून सोमवारी याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.