नवापूर :शहरात मोकाट फिरणार्या कुत्र्यांचा धुडगूस वाढीस आला आहे. एकाच परिसरातील चार जणांना सोमवारी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून, त्यापैकी एक बालक व वृद्ध महिला जखमी झाली. सोमवारी सकाळी १0 वाजेच्या सुमारास देवळफळीत लहान चिंचपाडा या जवळ असलेल्या भागात कृष्णा छोटू गावीत (७), रविदास धिरू मावची (८) या दोन्ही लहान बालकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. रस्त्यावरून जाणार्या काही लोकांनी कुत्र्यांना हाकलून लावले. ही घटना घडल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती घडली. शरीराने धडधाकड असलेल्या एका मोकाट कुत्र्याने सेबुबाई शिवा मावची (५0) रा. लहान चिंचपाडा व अरबाज नासीर पठाण (१४) रा.देवफळी यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले.सेबुबाई या वृद्धेचा हात ओरबाडून लचका तोडण्याचा प्रयत्न कुत्र्यांकडून करण्यात आला तर अरबाग या बालकास मानेपासून डोक्यापर्यंतच्या जखमा झाल्यात. अँटी रेबिजचे लसीकरण व प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शहराचा विस्तार पूर्ण होत असलेल्या निर्जनस्थळी अज्ञात ठिकाणाहून वाहनांद्वारे दोन वेळा काही अज्ञातांनी मोकाट कुत्रे सोडले आहेत. अशा कुत्र्यांची संख्या जवळपास ३0 आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) |