लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजअखेर तालुक्यात ५० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी सद्यस्थितीत १५ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात तर १० रुग्णांवर जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २१ रुग्ण बरे झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन महिन्यानंतर गरीब-नवाज कॉलनी परीसरात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.एप्रिल महिन्यात शहरात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वाधिक रुग्ण हे गरीब-नवाज कॉलनी परिसरात आढळून आले होते. मात्र मे महिन्यात गरीब-नवाज कॉलनी परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा या भागात ७० वर्षीय वृद्धाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने प्रशासन अलर्ट झाले असून परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. बाधित रुग्णाची प्रवास व इतर हिस्ट्री जाणून घेतली जात आहे. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बाधित रुग्णाच्या घराजवळ बॅरिकेटींग करण्यात आले असून परिसरात निर्जंतुकीकरण केले जात आहे.शहादा तालुक्यात 22 एप्रिलला पहिला बाधित रुग्ण आढळून आला तेव्हापासून आजपर्यंत प्रशासनातर्फे ४२२ नमुने तपासण्यात आले असून पैकी ३३३ शहरातील व ८८ ग्रामीण भागातील आहे. यापैकी ३१९ व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला असून यात २५२ शहर व ६७ ग्रामीण भागातील आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ४० नागरिकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यात शहरातील ३१ व ग्रामीण भागातील नऊ बाधित रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आजअखेर ६३ अहवालांची प्रतीक्षा असून यात शहरातील ५० व ग्रामीण भागातील १३ नमुन्यांचा समावेश आहे. बाधित रुग्णांपैकी शहरातील एक व ग्रामीण भागातील चार अशा पाच नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात १५ रुग्ण उपचार घेत असून यात शहरातील आठ व ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश आहे.शहरात २६ तर ग्रामीण भागात १४ असे एकूण ४० बाधित रुग्ण आजपर्यंत आढळून आले असून पैकी १५ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे १० रुग्णांवर धुळे व नाशिक येथे उपचार सुरु आहेत. यात शहरातील सहा व ग्रामीण भागातील चार बाधितांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांच्या अतिसंपर्कातील ३१५ व कमी संपर्कातील ३१७ असे एकूण ६३२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. पैकी मोहिदा येथील क्वारंटाईन सेंटरला ४७८ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. पैकी 412 नागरिकांनी कालावधी पूर्ण केल्यानंतर कुठलीही लक्षण आढळून आलेले नाही. त्याचप्रमाणे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर २२ नागरिकांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. तालुक्यात एकूण १५ कंटेनमेंट झोनची निर्मिती करण्यात आली असून शहरात नऊ तर ग्रामीण भागात सहा कंटेनमेंट झोन आहेत. शनिवारी १५ नागरिकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
शहादा तालुक्यातील २५ कोरोना रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:29 IST