महामार्गावरून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:10 PM2020-02-23T12:10:53+5:302020-02-23T12:11:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन ठेकेदार बदललेल्या अमरावती-सुरत महामार्गाच्या नवापूर तालुक्यातील ...

Traveling by highway is an invitation to death | महामार्गावरून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण

महामार्गावरून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू असलेल्या व दोन ठेकेदार बदललेल्या अमरावती-सुरत महामार्गाच्या नवापूर तालुक्यातील रस्त्याचे काम रखडल्याने महामार्गाची वाट लागली आहे. केंद्रीय भुपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे भुमिपूजन झाले होते. राज्यातील सर्वात दर्जेदार आणि मॉर्डन रस्ता तयार करण्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु या रस्त्याचे काम अर्ध्यातूनच बंद पडले असून नवीन ठेकेदारही नियुक्त होत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. महामार्गांची अवस्था तर सर्वात भयंकर आहे. एकही महामार्ग सुस्थितीत नाही. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्यात महामार्गही सुटलेला नाही. परंतु अमरावती-सुरत महामार्गाची दुखणे वेगळेच आहे. चौपदरीकरणाच्या नावाखाली हा महामार्ग थेट कोंडाईबारी ते गुजरात हद्दीपर्यंत खोदून ठेवला आहे. आहे तो रस्ताही दुरूस्त होत नसल्याची स्थिती आहे.
तिसरा आणि शेवटचा टप्पा
फागणे ते नवापूर तालुक्यातील गुजरात हद्दपर्यंतच्या रस्त्याचे काम सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. चौपदरीकरणामुळे आजूबाजुचे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी मातीचे भराव आहेत तर काही ठिकाणी तसाच खोदलेला रस्ता सोडून देण्यात आला. पूर्वीचा डांबरीकरणाचा रस्ता देखील अनेक ठिकाणी खोदलेला आहे. दोन वर्षात हे काम पुर्ण होणे अपेक्षीत असतांना ठेकेदाराने अर्ध्यातून काम सोडल्याने आहे त्या स्थितीत रस्ता सोडून देण्यात आला आहे. थेट कोंडाईबारीपासून ते बेडीकपाडापर्यंत अर्थात गुजरात हद्दपर्यंत हा रस्ता ठिकठिकाणी खड्डयांनी व्यापला आहे. पावसाळ्यात तर दीड ते दोन मिटर खोलीचे खड्डे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडले होते. अतिवृष्टीमुळे रस्ता व पूल खचल्याने १५ दिवस या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली होती. त्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनीच वर्गणी गोळा करून महामार्गाची तात्पुरती दुरूस्ती केल होती.
पुलांची अवस्थाही खराब
या महामार्गावर असलेल्या पुलांची अवस्था देखील अतिशय खराब झाली आहे. रायंगण नदीवरील पुुलाला कठडेच नसल्याने अनेकवेळा अपघात झाले आहेत. काही ठिकाणचे पूल कमकुवत आहेत. पावसाळ्यात रंगावली नदीवरील पुलावरून पाणी गेल्यामुळे या पुलाची अवस्थाही खराब झाली आहे.
दुरूस्तीकडेही दुर्लक्ष
चौपदरीकरणाचे काम होईल तेंव्हा होईल, परंतु आहे त्या रस्त्याची डागडुजी व दुरूस्ती करणे अपेक्षीत असतांना राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. नुकताच निधी मंजूर झाला, परंतु दुरुस्तीच्या कामाची गती फारच संथ आहे. सध्य स्थितीत गुजरात हद्दीकडून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.


महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याील अर्थात फागणे, ता.धुळे ते गुजरात हद्दीपर्यंत अर्थात बेडकीपाडापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची निविदा पुन्हा नव्याने मंजुर करण्यात आली आहे. त्याच्या ठेकेदाराचीही नेमणूक झाली असल्याचे बोलले जात आहे. परंतु काम कधी सुरू होईल आणि कधीपर्यंत पुर्ण होईल याची माहिती महामार्ग प्राधिकरण कार्यालयातर्फे देण्यात आली नाही. कार्यालयात संपर्क साधाला असता ही माहिती उपलब्ध नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Traveling by highway is an invitation to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.