लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला सध्या पर्यटकांची प्रतीक्षा लागली आहे. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून येथे पर्यटनाला बंदी घालण्यात आली होती. आता त्यात काहीअंशी सूट दिली असली तरी पाहिजे त्या प्रमाणात पर्यटक येत नसल्याने येथील विविध व्यवसायांवरही परिणाम झाला आहे.सातपुड्याच्या कुशीत समुद्र सपाटीपासून एक हजार ३६ मीटर उंचीवर असलेला तोरणमाळ परिसर सध्या हिरवाईने नटला आहे. तोरणमाळला जाण्याआधी पायथ्याशीच काळापाणी नावाचा एक पहाड आहे. याठिकाणी दोन छोटे धबधबे आहेत. ते झाडा-झुडपातून वाहताना दिसतात. या भागातील वातावरण शांत व नयनरम्य असे आहे. हा परिसर अतिदुर्गम असला तरी सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होते. सर्वच पॉर्इंट खूप आकर्षक आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. येथील खळखळून वाहणारे धबधबे, यशवंत तलाव, सीताखाई, मच्छिंद्रनाथाची गुफा, गोरक्षनाथ मंदिर, सनसेट पॉईंट, हिरवळीने सजलेले डोंगर, घाटातून जाणारा रस्ता. हे सर्व येणाºया पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडते. येथील सीताखाई पॉर्इंटवर असलेल्या दरीत आवाज जर दिला तर तो आवाज खाली जाऊन परत आपल्याला ऐकू येतो. यशवंत तलावही सद्यस्थितीत तुडुंब भरलेला आहे. पोहण्याचा आनंद घेणारे तलावात आंघोळ केल्याशिवाय राहत नाही. कमळ तलावातही मोठ्या प्रमाणावर फुले असून स्थाननक लहान मुले येणाºया पर्यटकांचे कमळाचे फूल देऊन स्वागतही करतात. येथे मच्छिंद्रनाथाची गुंफा असून त्यात जाण्यासाठी एक वेगळा खडतर मार्ग आहे. ज्यांना पर्यटनाचा आनंद आणि दर्शनासाठी जायचे असेल ते आवर्जून जातात. गोरक्षनाथ मंदिरात जाऊन पर्यटक भाविक दर्शन आवर्जून घेतात. मुक्कामी राहणारे पर्यटक सनसेट पॉर्इंटचा आनंद घेतात. या परिसरात आवळा, हिरडा, बेहडा, तुळशी, निलगिरी, बेल, कोरफड आदी औषधी वनस्पतीही आढळून येतात.
तोरणमाळला पर्यटकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:49 IST