लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : माहुरगडावरुन आलेल्या मशाल यात्रेकरुंनी असलोद, ता.शहादा येथे ज्योत आणली. या ज्योतीच्या माध्यमातून तेथील सप्तशृंगी माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. असलोद येथील पदयात्रा मित्रमंडळामार्फत मागील सात वर्षापासून पदयात्रा काढण्यात येत आहे. सहा वर्षे या मंडळाने सप्तशृंगी गडावर पदयात्रा काढली होती. तेथून मशाल यात्रेच्या रुपात गडावरुन ज्योत आणली जात होती. त्या ज्योतीच्या माध्यमातून असलोद येथील सप्तशृंगी माता मंदिरात आदिशक्ती देवीची स्थापना करण्यात आली होती. यंदा मात्र माहूरगडावर पदयात्रा काढण्यात आली होती. तेथून पुन्हा मशाल यात्रा काढत गडावरुन ज्योत आणली. या ज्योतीने देवीची स्थापना करण्यात आली. या मशाला यात्रेत भटू पाठक, धर्मा शिंदे, दिलीप राजभोज, उद्धव पाटील यांच्यासह 60 ते 65 जणांचा समावेश होता. नवरात्रोत्सवनिमित्त असलोद गावासह परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तरूणाई व महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नऊ दिवसात तेथे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, असलोद येथून पायी कावडयात्राही काढण्यात येते. प्रकाशा येथील तापी नदीपात्रातून कावडयात्रेद्वारे पाणी नेण्यात येऊन गडावर यात्रोत्सव काळात सप्तशृंगी देवीचा जलाभिषेक करण्यात येतो. या कावडयात्रेतही भाविक सहभागी होतात.
पदयात्रेत प्रामुख्याने युवकांचा समावेश आहे. या युवकांनी माहूरगडावरुन ही ज्योत केवळ 60 तासात असलोद येथे पदयात्रेने आणली. ज्योतीच्या माध्यमातून असलोदसह मंदाणे, म्हसावद, प्रकाशा, कोंढावळ, ब्राrाणपुरी येथेही घटस्थापना करण्यात आली.