बैठकीचे उद्घाटन महाराष्ट्र अंनिसच्या तळोदा शाखा उपाध्यक्ष तथा सहायक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी यांनी केले. यावेळी अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. डी. बी. शेंडे, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा प्रधान सचिव कीर्तीवर्धन तायडे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. नीलेश गायकवाड, तळोदा शाखा अध्यक्ष मंगलसिंग पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. अंनिसच्या वतीने वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाअंतर्गत आतापर्यंत घेण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचा आढावा घेण्यात आला. अंनिसच्या कामात जिल्ह्यात युवांचा सहभाग वाढवण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवणे. जबाबदारी निश्चित करणे. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी नियोजन व आखणी करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. या जिल्हा बैठकीला नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा येथील अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अंनिसचे तळोदा शाखेचे कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, प्रधान सचिव अमोल पाटोळे, प्रा. सुनील पिंपळे, प्रा.डॉ. प्रशांत बोबडे, प्रा. रविकांत आगळे, प्रा. राजू यशोद, अनिल निकम, स्वप्निल महाजन आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले.
नंदुरबार जिल्ह्यात आजही डाकीण प्रथेचा प्रश्न गंभीर असून अनेक महिला या प्रथेला बळी पडत आहेत. यातून येत्या काळात डाकीण प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा यासंदर्भात अंनिसच्या वतीने प्रबोधन अभियान राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सातपुड्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात 'अंनिस विचार संवाद यात्रा' काढून या यात्रेच्या निमित्ताने सातपुड्यातील डाकीण प्रथेच्या विरोधात प्रशासनाला सोबत घेऊन प्रबोधन मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.