मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाढव नेहमीच दुर्लक्षीत प्राणी राहिला आहे. केवळ काम करवून घेणे आणि उघडय़ावर सोडून देण्याचे प्रकार गाढवांकडून करून घेतले जातात. आता मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात तरी गाढवांना बरे दिवस येणार आहेत. ज्या वाडय़ा, पाडय़ांना रस्ते नाहीत अशा ठिकाणी गाढवांवरून पाणी पुरवठा करण्याचा विचार नंदुरबार जिल्हा प्रशासन करीत आहे. जिल्ह्यात सद्य स्थितीत अडीच हजार गाढवे असल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे आहे. ‘गाढव’ नाव ऐकताच एक दुर्लक्षीत आणि मालकासाठी नेहमीच काम करून देणारा प्राणी म्हणून त्यांचे वर्णन समोर येते. कुणाला मुर्खात काढायचे झाल्यास त्याला त्या नावाने देखील उपरोधीकपणे बोलले जाते. परंतु हेच गाढवं अनेकदा कामाला येतात. आता देखील नंदुरबार जिल्हा प्रशासनासाठी ही गाढवं कामाला येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात पूर्वी गाढवांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात होता. विशेषत: निवडणुकीच्या काळात निवडणूक साहित्य मतदान केंद्रांर्पयत वाहून नेण्यासाठी प्रशासनाला गाढवांची शोधाशोध करावी लागत असे. गेल्या काही वर्षात दळणवळणाची सुविधा वाढल्याने निवडणुकीच्या कामातून गाढवं हद्दपार झाली होती. परंतु आता पुन्हा प्रशासनासाठी गाढवं शोधण्याची वेळ येणार आहे. सातपुडय़ातील दुर्गम भागातील गाव, पाडय़ांवर यंदा भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशा ठिकाणी पाणी पुरवठा योजना घेता येत नाही, टँकर, बैलगाडीनेही पाणी पुरवठा होऊ शकत नाही. अशा ठिकाणी आता गाढवांवरून पाणी पुरवठा करण्याची मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे. त्याला जिल्हा प्रशासनाने तत्वत: मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे सातपुडय़ात आता गाढवं शोधण्याची वेळ प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचा:यांवर येवून ठेपली आहे. जिल्ह्यात पशु गणनेच्या नोंदीनुसार जवळपास अडीच हजार गाढवं असल्याची नोंद आहे. तर 2011 च्या गणनेनुसार 2,138 गाढवं आहेत. त्यात अक्कलकुवा तालुक्यात 244,तळोदा 6, धडगाव, 10, शहादा 1,749, नंदुरबार 58 तर नवापूर तालुक्यात 81 गाढवांची नोंद पशुगणनेत झालेली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अधिका:यांवर येणार ‘गाढवं’ शोधण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:47 IST