लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली असून सकाळी तिघे कोरोनामुक्त होवून घरी परतले होते़नंदुरबार शहरातील सिद्धी विनायक चौक, खान्देशी गल्ली तळोदा तर गणेश नगरातील शहादा येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे़ यामुळे जिल्ह्यात संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या १४८ एवढी झाली आहे़ दरम्यान या तीन रुग्णांना रवाना करण्यात आल्यानंतर दुपारी नाशिक येथे दाखल असलेल्या चौधरी गल्लीतील चार बाधितांची रवानगी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली़ तर प्राप्त झालेल्या अहवालात तोरखेडा ता़ शहादा येथील ४७ वर्षीय महिला, सदाशिव नगर, शहादा येथील ४२ वर्षीय महिला तर मुलबीच नगर शहादा येथील २० वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे़ प्रशासनाने तातडीने याठिकाणी भेटी देत उपाययोजनांना सुरूवात केली़नव्याने आढळलेले तीन आणि ट्रान्सफर झालेले चार अशा सात बाधितांमुळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या ही २२४ झाली आहे़ आतापर्यंत कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला असून १४८ जण संसर्गमुक्त झाले आहेत़ जिल्हा रूग्णालय आणि एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल याठिकाणी कोविड कक्षांमध्ये ६० जणांवर उपचार सुरू आहेत़
जिल्ह्यातील आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:31 IST