लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने शहादा शहर ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश दिले होते. बुधवारी हा कालावधी संपला असून गेल्या चार दिवसाच्या कालावधीत प्रशासनाच्या आदेशाचे नागरिकांनी समर्थन केले असले तरी गुरुवारपासून लॉकडाऊन हटविल्यानंतर बाजारात होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.प्रशासनाने रुग्णालय, औषध विक्रेते, शासकीय कार्यालय व दूध विक्रेते वगळता किराणा दुकाने, भाजीपाला यासह सर्व प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परिणामी गेल्या चार दिवसात याचे चांगले परिणाम दिसून आले असले तरी ९ जुलैपासून लॉकडाऊन हटविले जाणार असल्याने किराणा व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी नागरिकांची गर्दी थोपविण्यासह नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मार्च महिन्यापासून ४ जुलैपर्यंतचा कालावधीत पहिल्यांदाच किराणा दुकाने व भाजीपाला लॉकडाऊन दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. याचे नागरिकांनी तंतोतंत पालन केल्याने नव्याने शहरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही. ही सकारात्मक बाब असली तरी गेल्या १० दिवसांपासून बाधीत रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने शहरात कोरोना विषाणूची साखळी ब्रेक झाली किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.मागील नऊ दिवसांपासून अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे पुढील हालचालीस मर्यादा येत आहेत. एकदम सर्व अहवाल आल्यास दुर्दैवाने कोरोना विषाणू बाधीत अहवाल आल्यास त्या रुग्णाच्या अतिसंपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन बाधीत रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यासह कंटेन्टमेंट झोन बनविणे, बाधीत रुग्णाची प्रवास व इतर माहिती जाणून घेणे या सर्व बाबतीत अडचण निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडणार आहे. स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर त्याची तपासणी होऊन लवकर अहवाल मिळावा यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेची गरज आहे.-डॉ.चेतन गिरासे, प्रांताधिकारी, शहादा.
गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाची कसरत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:52 IST