महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागातील उच्छल परिसरात २० दिवसांत अचानक दोन हजार कोंबड्या मरण्याची घटना घडल्याचे वृत्त गुजराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. परंतु गुजरात प्रशासनाने कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी दिलेली नाही. नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लूसंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. याबाबत प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. देशातील सहा राज्यात बर्ड फ्लू आला असला तरी राज्यात कुठेही बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आले नसली तरी पोल्ट्रीचालकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यात पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. कुठेही अचानक पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला, तर जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य ती खबरदारी प्रशासनाच्या आणि पोल्ट्री व्यावसायिकांच्या वतीने घेतली जात आहे.
२००६ मध्ये नवापूर तालुक्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू झाला होता. संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला होता. साधारण ३०-३५ कोटींचे नुकसान झाले होते. शासनाने २० कोटींची मदत दिली होती. २००६ पूर्वी नवापूर तालुक्यात ३० पोल्ट्री फार्म होते. परंतु बर्ड फ्लूने संपूर्ण नवापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय ठप्प झाला. अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. २००६च्या बर्ड फ्लूने निम्म्याहून अधिक पोल्ट्री फार्म बंद झाले. सध्या १३-१४ पोल्ट्री सुरू आहेत. त्यानंतर नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नाही. पोल्ट्री व्यावसायिकांनी घाबरून न जाता खबरदारी म्हणून पक्ष्यांचे वेळोवेळी लसीकरण व देखभाल करणे गरजेचे आहे, असे मत पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बर्ड फ्लूची लक्षणे
कफ, अतिसार, ताप, श्वसन समस्या, डोकेदुखी, स्नायू वेदना, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि अस्वस्थता यासारख्या समस्या बर्ड फ्लूची लक्षणे आहेत. जर आपल्याला यापैकी कोणती लक्षणे जाणवत असतील तर दुसर्या एखाद्याच्या संपर्कात येण्यापूर्वी डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते.
बर्ड फ्लू नेमका काय आहे
बर्ड फ्लूचे बरेच प्रकार आहेत. परंतु एच-५ एन-१ हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता.
देशात कुठेही पोल्ट्रीला बर्ड फ्लूची लागण नाही
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. आतापर्यंत पोल्ट्रीतील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आली नाही. आमच्याकडे भोपाळ लॅबचा अहवाल आहे. त्यामध्ये भारतातील कुठेही पोल्ट्रीतील कोंबडीला लागण झाल्याची माहिती दिसून आली नाही. परंतु भीतीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. आम्ही वेळोवेळी पक्षांची काळजी घेत आहोत. पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांशीही आमचा संपर्क सुरू आहे.
-आरिफ बलेसरिया, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नवापूर