लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरूवारी रात्री दोन 2.20 ते 2.40 वाजेच्या दरम्यान चार लाख 40 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली.महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपीक मीना अनिलभाई शाह यांनी नवापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, महाविद्यालयाचे शिपाई विजय कुलकर्णी यांनी गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास महाविद्यालयाचे कार्यालय उघडले असता कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यावर लावलेले कुलूपच गायब होते. कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. लेखा विभागाच्या दोन कपाटात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यातील बरीचशी कागदपत्रे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती. त्यातील एका कपाटात ठेवलेले चार लाख 30 हजार 800 रुपये चोरटय़ांनी काढून नेले. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कामाचा मेहनताना रक्कम वाटप करण्यासाठी ही रक्कम काढण्यात आली होती. मुख्य लिपीक प्रकाश बाविस्कर यांनी दैनंदिन खर्चासाठी दुस:या कपाटात रोख नऊ हजार 800 रुपये ठेवले होते. ती रक्कमही चोरटय़ांनी चोरुन नेली. महाविद्यालय आवारात सात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. चोरटय़ांनी कार्यालयासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा उलटा करून ठेवला तर कार्यालयातील एक कॅमेरा आत प्रवेश केल्यानंतर एका चोरटय़ाने फिरवून दिला. सुमारे 25 मिनिटे शांत डोक्याने चोरी करुन पळून जाण्याआधी चोरटय़ांनी सुमारे पाच हजार रुपये किमतीचा एका संगणक संचाचा सीपीयू चोरुन नेला. कॅमे:यांची रेकार्डीग त्या सीपीयूमध्ये होत असावी या आशंकेने त्याची चोरी झाल्याचा कयास लावला जात आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती नवापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. नंदुरबार येथून मोती नामक प्रशिक्षित श्वानाने महाविद्यालयाच्या उत्तरेकडील भागात एका कॉम्प्लेक्ससमोर पावेतो माग दाखविला. ठसे तज्ञांच्या पथकाने ठसेही घेतले.
महाविद्यालयाच्या कार्यालयातील दोन सीसीटीव्ही कॅमे:यात दोन चोरटय़ांचे चेहरे आले आहेत. पोलिसांनी त्याचा धागा पकडून तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. नवापूरचे सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. शिंपी, पो.कॉ.अजय बाविस्कर, प्रवीण मोरे, योगेश थोरात, वाघ यांनी घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास हाती घेतला आहे.