नाशिक आदिवासी विकास विभागाने यंदा तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील साधारण २७ शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या गेल्या महिन्यात करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्या जागेवर अजूनही पर्यायी शिक्षक देण्यात न आल्याने येथील प्रकल्प प्रशासनाने त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. या प्रकरणी संबंधित शिक्षकांनी १५ ते २० दिवसांपूर्वी प्रत्यक्ष प्रकल्प अधिकाऱ्याची भेटदेखील घेतली होती. त्या उपरांतही कार्यमुक्त करण्याबाबत उदासीन भूमिका घेतली आहे. वास्तविक या शिक्षकांनी अशा दुर्गम भागात तब्बल १० ते १२ वर्ष सेवा केली आहे. शिवाय त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश असताना अजूनही तेथून सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या शिक्षकांनी थेट नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात जावून आयुक्त यांनाच साकडे घातले. त्यांनी आपल्या बदलीची कैफियत त्यांचा समोर मांडली. प्रकल्प प्रशासन कार्यमुक्त करीत नसल्याबाबत त्यांनी तक्रार केली. त्यावर याबाबत संबंधितांशी चर्चा करून लवकरच तसे पत्र देण्याचे आश्वासन शिक्षकांना दिले. या वेळी आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस बी.टी. भामरे, प्रकल्प अध्यक्ष सुनील गावीत, प्रकल्प कार्याध्यक्ष विलास सोनवणे, सचिव गणेश दाभाडे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, एस.सी. पाटील आदींसह बदली झालेले शिक्षक उपस्थित होते.
बदली झालेल्या आश्रमशाळेतील शिक्षकांनी कार्यमुक्तीसाठी आयुक्तांनाच घातले साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST