नंदुरबार : शाळा सुरू करण्यासाठी एकीकडे शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे कल असताना आता ५ सप्टेंबर ही लसीकरण पूर्ण करून घेण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची धावपळ सुरू झाली आहे.
कोरोनाचे लसीकरण सुरू होऊन जवळपास आठ महिने पूर्ण झालेले आहे; मात्र अद्यापही काही शिक्षकांनी लसीकरण पूर्ण केलेले नाही. या शिक्षकांना आता लसीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे. ग्रामीण भागात ॲानलाइन व ॲाफलाइन शिक्षण सुरू झालेले आहे. ॲानलाइनची सुविधा नाही, अशा गावांमध्ये शिक्षक जात असून, विद्यार्थ्यांना गटागटाने शिकवित आहेत. आता तिसरी लाटेची शक्यता आहे. त्यातच आगामी महिन्यात शहरी भागातील शाळाही सुरू होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेण्याची गरज आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बाकी आहेत, त्यांना विविध आजारांमुळे अडचणी आहेत.
लसीकरण सर्वांसाठी सुरक्षित
कोरोना संसर्गापासून बचावासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र कॅम्प आयोजित केल्याने, जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. व्याधीग्रस्त शिक्षक बाकी आहेत.
शिक्षकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध होताच आपण पहिला डोस त्याचवेळी घेतला होता. ठरावीक अंतराने दुसरा डोसदेखील घेतला आहे. आपल्या शाळेतील इतर शिक्षकांचेदेखील दोन्ही डोस पूर्ण झाले असून, शैक्षणिक कामकाज सुरू आहे.
-डी. वाय. पाटील, शिक्षक.
आपल्यासह शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शिवाय कुटुंबातील पात्र व्यक्तींचेही लसीकरण करून घेतले आहे. विद्यार्थी व इतरांच्या दृष्टीने ते सोयीचे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही चांगले आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करावे.
-एम. के. पाटील, शिक्षक.