प्रकाशा : येथील तापी नदीला पूर आला असून, प्रकाशा बॅरेजचे १० गेट पूर्णक्षमतेने उघडले असल्याने एक लाख २५ हजार ६६४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र; प्रकाशा पंचक्रोशीत पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ६५ मि.मी. पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
याबाबत असे की, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने शुक्रवारी सकाळी सहा वाजता हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्यामुळे प्रकाशा येथील बॅरेजला रात्री सात वाजेपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. तेव्हा प्रकाशा बॅरेजने सहा गेट उघडले होते. मात्र पाण्याची क्षमता वाढल्याने प्रकाशा बॅरेजचे सकाळी सहा वाजता १० गेट पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. त्यातून एक लाख २५ हजार ६६४ क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात येत आहे.
प्रकाशा येथील तापी नदीला १०७ मीटर पाणी स्टेबल करण्यात आले आहे. यामुळे तापी नदी दोन्ही काठ दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे महसूल व ग्रामपंचायतीकडून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तापी नदीमध्ये या वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पाणी बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक गर्दी करीत आहेत.
पंचक्रोशीत पाऊस नसल्याने ठणठणाट व शेतकरी चिंतातूर
कृषी विभाग म्हणतं १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. त्यामुळे प्रकाशा परिसरात जवळपास अजूनही पेरणी बाकी आहे.
प्रकाशा येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पर्जन्यमापक आहे. तेथील नोंदणीनुसार ६ जूनपासून आतापर्यंत ६५ मि.मी. पाऊस झालेला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र प्रकाशासह पंचक्रोशीत ६५ मि.मी. पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. अजून जवळपास ९० टक्के पेरणी बाकी आहे. ज्यांनी पेरणी केली आहे. त्यांच्या पिकांनाही पाणी मिळत नसल्याने पीक वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एवढं करून ही पाऊस येत नाही म्हणून शेतकरी संकटात सापडला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली व ज्यांनी पेरणी केली नाही तेही संकटात सापडल्याचे चित्र प्रकाशा शिवारात दिसून येत आहे. प्रकाशासह इतर गावातही दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ज्वारी, तूवर, मूग, सोयाबीन, कापसाची ज्यांनी पेरणी केलेले आहे. त्या पिकांना पावसाळ्याचे पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी पेरणी केली तेदेखील संकटात सापडलेले आहे. अशाप्रसंगी कृषी विभागाने व महसूल विभागाने लक्ष देऊन प्रकाशासह पंचक्रोशीत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रकाशासह पंचक्रोशीत पाऊस नाही. तसेच जिल्ह्यात १३० मि.मी. पाऊस झाला असला तरी प्रत्यक्षात प्रकाशा परिसरात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. एकीकडे कृषी विभाग १०० मी.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सांगत असलल्याने आमच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी प्रेरणी केली आहे. त्यांनादेखील पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करावे लागत आहे. तेव्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. -हरी दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा
प्रधानमंत्री राष्ट्रीय विमा योजनेची मुदत १५ जुलैपर्यंत होती. मात्र, पुन्हा शासनाने वाढवून ती २३ जुलै केली. परंतु प्रकाशा परिसरात पाऊसच नसल्याने आम्ही पेरणी केलेली नाही. पुढे पाऊस चांगला झाल्यास पीकविमा योजनेची मुदतवाढ करून द्यावी, अशी आमची मागणी आहे - किशोर बुलाखी चौधरी, शेतकरी, प्रकाशा