उपप्रादेशिक परिवहन विभागाचे तालुकास्तरीय कॅम्प गेल्या १८ महिन्यांपासून बंद असल्याने हे कॅम्प तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी वाहन चालक व मालकांनी केली होती. या शिवाय मुदतीत कामे होत नसल्याने तक्रारींच्या संख्येतही कमालीची वाढ होत चालली होती. या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कॅम्प या महिन्यापासून सुरू करण्यात आले असून, ते महिन्यातून दोन वेळा प्रत्येक तालुक्यातील शहराच्या ठिकाणी होतील या पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे वाहन चालक परवानासह वाहन संदर्भातील अत्यावश्यक प्रमाणपत्रांच्या पूर्ततेसाठी हे कॅम्प वाहन चालक व मालकांना फायदेशीर ठरणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या १८ महिन्यापासून बंद असलेले तालुकास्तरीय कॅम्प पुन्हा सुरू झाले असून, मंगळवारी पहिल्या दिवशी शहादा येथील विश्रामगृहात आयोजित कॅम्पला तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. वाहन निरीक्षक पोतदार यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची छाननी पूर्ण करीत ७८ वाहनचालकांची टेस्ट ड्राईव्ह घेऊन त्यांना वाहन चालक परवाना दिले.
मोटार वाहन अधिनियमानुसार दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालविताना वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना अत्यावश्यक आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कॅम्प बंद असल्यामुळे गेल्या १८ महिन्यात अनेकांच्या परवान्याची मुदत संपली होती. कॅम्प बंद असल्याने मोठ्या प्रमाणात परवाना नूतनीकरण मिळविण्यासाठी अर्जांची संख्या सर्वाधिक होती. त्या तुलनेत परवाने देण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये तालुकास्तरीय कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. वाहनचालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. - एच.ए. पोतदार, मोटार वाहन निरीक्षक, नंदुरबार