नंदुरबार- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नंदुरबार, शहादासह इतर ठिकाणच्या गुन्हेगारांवर येत्या १५ दिवसात तडीपारची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय हद्दपारीचे प्रस्ताव त्या त्या प्रांत कार्यालयांना पाठिवण्यात आले असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
येत्या काळात साजरा होणारे सण, उत्सव लक्षात घेता गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढू नये यासाठी पोलीस विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत काही जणांवर तडीपारसारखी कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर गुन्ह्यातील अनेकजण विविध कारणांनी सद्या बाहेर आहेत. अशा गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असली तरी त्यांना तडीपार करणे आवश्यक असते. त्यानुसार वारंवार तेच गुन्हे करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून नंदुरबार व शहाद्यातील काही जणांना येत्या काळात तडीपारच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या दोन शहरांव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरही अशी कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, पोलीस विभागातर्फे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव त्या त्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. परंतु त्यावर अनेक दिवसांपासून निर्णय झालेला नाही. अशा फाईलींवरील निर्णय लवकर झाल्यास पोलिसांचे कामदेखील सुकर होत असते, असेही पोलीस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.