लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभाग व शबरी वित्त विकास महामंडळातील २०१६ मधील नोकर भरती प्रक्रिया तक्रारी व त्या अनुषंगाने नेमलेली चौकशी समितीच्या अहवालावरून रद्द करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी दिली. यामुळे जवळपास साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर यामुळे टांगती तलवार निर्माण झाली आहे.२०१६ मध्ये या दोन्ही विभागात नोकरी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. ५८४ पदांसाठी जाहिरात काढून खाजगी संस्थेकडून पहिल्या टप्प्यात ३६१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली. त्यासाठी ३६ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरती प्रक्रियेवर अनेकांनी आक्षेप घेवून गैरव्यवहाराचा आरोप केला होता. तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याने सचिव एकनाथ डवले यांनी चौकशी केली.त्याचा अहवाल नुकताच आदिवासी विकास विभागाकडे सादर झाला होता. त्या आधारे आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. यामुळे या भरती प्रक्रियेत नियुक्त कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.
साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर आता टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:12 IST