यावेळी भूवैज्ञानिक अधिकारी सुवर्णा गांगुर्डे यांनी डोंगरदऱ्यात प्रवास करत खडकला बुद्रुक गावातील लोकांशी चर्चा करून गावात पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली. तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई असलेल्या खडकला बुद्रुकसारख्या गावांना प्रथम या योजनेत प्राधान्य देण्यात यावे, अशी इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली. नंदुरबार जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, खडकला बुद्रुक येथील रमेश मोत्या पटले यांनी सांगितले की, आमच्या गावात अनेक हातपंप व विहीरदेखील आहेत. मात्र, हातपंपाला पाणी लागले नाही व विहिरीही उन्हाळा सुरू झाल्यानंतर कोरड्या पडतात. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्यासाठी रात्री-बेरात्री फिरावे लागते. जिथे पाणी आहे, तिथे घाट असल्याने जाण्या-येण्यास मोठ्या अडचणी असतात. दीड किलोमीटर अंतराचा घाट चढून पाणी आणावे लागते. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत खडकलासारख्या टंचाईग्रस्त गावाचा आधी विचार करावा, असे सांगितले.